CPR Hospital | सीपीआरमध्ये ‘आधी वर्दी, मगच उपचार’

डॉक्टरांआधी गाठावी लागते पोलिस चौकी; नातेवाईकांचा संताप
Kolhapur CPR Hospital
CPR Hospital | सीपीआरमध्ये ‘आधी वर्दी, मगच उपचार’(File photo)
Published on
Updated on

सतीश सरीकर

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजेच सीपीआर हे कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटकातील गोरगरीब रुग्णांच्या आशेचा अखेरचा श्वास. ‘सीपीआरमध्ये जीव वाचतो’ हा विश्वास घेऊन दररोज शेकडो रुग्ण सीपीआरमध्ये धाव घेतात; मात्र याच सीपीआरमध्ये सध्या सुरू असलेली एक अमानवी, बेजबाबदार आणि धक्कादायक प्रथा माणुसकीला काळिमा फासणारी ठरत आहे. ‘आधी वर्दी मग उपचार’ असा अलिखित फतवा काढल्याने नातेवाईक हतबल होत आहेत. मरणासन्न रुग्णांसमोर डॉक्टरांची पाठ फिरवणारी अमानवी व्यवस्था पाहून संताप अनावर होत आहे.

‘आधी पोलिस चौकीत जा’ हा आदेश कोणाचा?

अपघात विभागात विषारी द्रव प्राशन केलेला रुग्ण तडफडत असतो. गळफास घेतलेली तरुणी श्वासासाठी झगडत असते. अपघातातील जखमी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेला असतो. अशावेळी रुग्णांचे नातेवाईक एकच अपेक्षा ठेवून धावत असतात, आधी जीव वाचवा, बाकी नंतर पाहू; पण अशा अवस्थेतही सीपीआरच्या अपघात विभागात ड्युटीवर असलेले डॉक्टर व कर्मचारी रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर असतानाही ‘आधी पोलिस चौकीत वर्दी द्या, मग उपचार होतील’ असे सांगतात. उपचाराऐवजी आधी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह हा आदेश नेमका कोणाचा?

‘तोपर्यंत माझा भाऊ मरत होता’

कागल तालुक्यातील एका तरुणाने विषारी द्रव प्राशन केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. कुटुंबीयांनी तातडीने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. अपघात विभागात पोहोचताच डॉक्टरांनी ‘ही पोलीस केस आहे, आधी चौकीत वर्दी द्या’ असे सांगितले. रुग्णाच्या भावाने हात जोडून विनवणी केली. त्याचा भाऊ तडफडत होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता; पण त्याला चौकीत पाठवण्यात आले. तो वर्दी देऊन येईपर्यंत त्याची अवस्था आणखी बिघडली. अशा घटनांमध्ये काही वेळा रुग्णांचा जीव जातो, तर काही वेळा ते वाचतात; पण या प्रक्रियेमुळे अमूल्य वेळ वाया जात असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.

सीपीआर हे रूग्णालय आहे की पोलिस चौकी? इथे स्टेथोस्कोप चालतो की डायरी? इथे इंजेक्शन आधी की सही, असे प्रश्न शेकडो नातेवाईक विचारत आहेत. अपघात विभागात उभे असलेले नातेवाईक रडत, ओरडत, हात जोडत विनवण्या करत असतात. ‘डॉक्टर साहेब, आधी उपचार करा, माझा माणूस मरतोय’! पण, समोरून मिळणारा प्रतिसाद अनेकदा बर्फासारखा थंड असतो. पोलिसांत नोंद झाल्यानंतरच रुग्णावर उपचार सुरू होत असल्याचा आरोप नातेवाईकांतून केला जात आहे.

मानवी संवेदनेचा प्रश्न

सीपीआर ही केवळ इमारत किंवा व्यवस्था नाही; ते माणसांच्या आशा-अपेक्षांचे केंद्र आहे. अपघात विभागात उभे असलेले नातेवाईक डोळ्यांत पाणी, हात जोडलेले, धडधडणारे हृदय घेऊन उभे असतात. त्या क्षणी ‘पहिले कागद, मग उपचार’ हे शब्द त्यांच्या काळजावर घाव घालणारे ठरत आहेत. एका वृद्धाने सांगितले, माझ्या नातवाने गळफास घेतला होता. आम्ही कसंबसं जिवंत अवस्थेत आणलं; पण डॉक्टर म्हणाले, आधी पोलिस चौकीत जा. त्या क्षणी मला वाटलं, हे हॉस्पिटल आहे की कोर्ट?

पोलिसही अस्वस्थ

या प्रकारामुळे केवळ रुग्णांचे नातेवाईकच नाही, तर सीपीआरमधील पोलिस कर्मचारीही संतप्त आहेत. एका पोलिस कर्मचार्‍याने सांगितले, ‘आम्ही कधीही उपचार थांबवायला सांगत नाही. आधी जीव वाचवा, मग नोंद करा’ हेच आम्हीही सांगतो; पण डॉक्टर आमच्यावर ढकलतात. रुग्ण मरणासन्न असताना आधी उपचार व्हायला हवेत. आम्ही नंतर पंचनामा, नोंद करू शकतो; पण डॉक्टर आमच्याकडे बोट दाखवतात आणि नातेवाईक आमच्यावर चिडतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news