Panhala Fort | पन्हाळा किल्ल्याची ‘युनेस्को’कडून पाहणी

धर्मकोठी, सज्जाकोठी, अंबरखाना, तीन दरवाजांसह विविध ठिकाणांना भेटी
Panhala Fort
पन्हाळा किल्ल्याची ‘युनेस्को’कडून पाहणीfile photo
Published on
Updated on

कोल्हापूर/पन्हाळा : प्रतिष्ठित जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून ‘युनेस्को’च्या शिष्टमंडळाने शनिवारी पन्हाळा किल्ल्याची पाहणी केली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकार्‍यांसह ‘युनेस्को’च्या पथकाने किल्ल्याची तीन तास सखोल पाहणी केली.

भारतातील मराठा लष्करी भूप्रदेशासाठी जागतिक वारसा नामांकनाचा प्रस्ताव राज्य शासनाने ‘युनेस्को’ला पाठवला आहे. त्यात राज्यातील पन्हाळ्यासह रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी यासह तामिळनाडू राज्यातील जिंजी अशा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांच्या अलौकिक कर्तृत्वाच्या आणि तेजस्वी इतिहासाची साक्ष देणार्‍या 12 किल्ल्यांचा समावेश आहे.

या पथकाने आज पन्हाळ्यावरील धर्मकोठी, सज्जाकोठी, अंबरखाना, तीन दरवाजा या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक खुणांना भेटी दिल्या. पथकाने किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकार्‍यांकडून तपशीलवार माहिती घेतली. या पथकात आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ हेवान्ग ली, जागतिक वारसाचे (एएसआय) अतिरिक्त महासंचालक जानवीश शर्मा, राज्याच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, डॉ. शुभा मजुमदार यांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान, वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली. तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय, सुरू असलेली कार्यवाही तसेच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. यावेळी स्थानिक नागरिकांनी पन्हाळा संवर्धनासाठी स्वच्छता व प्रशासनाने दिलेल्या सूचनांबाबत साहाय्य केले असून, यापुढेही करणार असल्याचे सांगितले.

‘युनेस्को’ने नामांकनाच्या यादीमध्ये पन्हाळा किल्ल्याचे नाव समाविष्ट केल्याबद्दल येडगे यांनी आभार व्यक्त केले. गडाच्या जतनामध्ये एकूणच प्रशासन, स्थानिक नागरिकांचा असलेला सहभाग याविषयी माहिती दिली. यावेळी पथकातील मान्यवरांनी पन्हाळा किल्ल्याविषयक केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकर्‍यांशीदेखील संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पन्हाळा-शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली मडकर, मुख्याधिकारी चेतन माळी आदींनी चर्चेत सहभाग घेतला. पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांशी, स्थानिक नागरिकांशीही या पथकाने संवाद साधला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news