

राजेंद्र जोशी
कोल्हापूर : महाराष्ट्रात बुवाबाजी, गंडेदोेरे, गैरव्यवहार, घोटाळ्यांचे आरोप-प्रत्यारोप, राजकीय संदोपसुंदी यांची चर्चा शिगेला पोहोचली की, काही कार्यक्रम गुुपचूपपणे उरकणारी एक यंत्रणा सक्रिय होते. कोणतीही चर्चा वा गाजावाजा न करता कार्यक्रम उरकले जातात. असाच एक कार्यक्रम मार्च महिन्यात उरकला गेला. एकेकाळी महाराष्ट्राचे भूषण म्हणून गौरविल्या जाणार्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या हाफकिन बायोफार्मास्युटिकल कार्पोरेशन या संस्थेचा कार्यक्रम केला गेला. या संस्थेकडे असलेल्या लसींच्या सीड स्ट्रेनचा जॉईंट व्हेंचर वा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप या गोंडस नावाखाली बाजार मांडला.
सर्वसामान्य जनतेसाठी लसनिर्मिती करण्यासाठी उभ्या करण्यात आलेल्या 100 वर्षांपूर्वीच्या मोठ्या आरोग्य उपक्रमावर यथावकाश नांगर फिरेल. मात्र, सुमारे 1500 कोटी रुपये शासकीय मूल्य असलेल्या या उपक्रमाच्या विल्हेवाटीची महिनाभर चाललेल्या राज्याच्या विधिमंडळात पुसटशी चर्चाही होऊ नये, यावर सभागृह निस्तेज होत चालले आहे, असा कोणी आरोप केला तर तो खोडून कसा काढणार?
हाफकिन बायोफार्मास्युटिकल इन्स्टिट्यूट ही धनुर्वात, घटसर्प, कुक्कुरखोकला, पोलिओ, रेबिज, प्लेग या लसींसह सर्पदंश, विंचूदंश, गॅस गँग्रीन, टिटॅनस यावर अँटिसिरा यांचे उत्पादन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्रातील महत्त्वाचा उपक्रम होता. राज्य शासनाने हाफकिन बायोफार्मास्युटिकल कार्पोरेशन फेब्रुवारी महिन्यात आपल्याकडे असलेल्या लसी आणि अँटिसिराच्या सीड स्ट्रेन/ मास्टर सीडची स्वामित्त्व हक्काआधारे विक्री करणारी एक जागतिक निविदा प्रसिद्ध केली. या निविदेची मुदत 18 फेब्रुवारी ते 4 मार्च 2026 दरम्यान होती. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूच्या चर्चेत महाराष्ट्र अडकला होता. परंतु, त्याच्या पडद्यामागे एका शतकोत्तर संस्थेचा बाजार मांडला जात होता. याची पुसट कल्पना विधिमंडळातील सदस्यांना, विरोधी पक्षांच्या नेत्यांना असू नये, हा योगायोग निश्चितच नाही.
1897 मध्ये शोधली प्लेगवरील लस
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतामध्ये प्लेग थैमान घालत होता. या प्लेगच्या मुसक्या बांधण्यासाठी डॉ. वाल्देमार हाफकिन यांनी सर्वात मोठे योगदान दिले. त्यांनी मुंबईत 10 ऑगस्ट 1897 रोजी प्लेग रिसर्च लॅबोरेटरी स्थापन करून प्लेगवरील लस शोधून काढली आणि भारतालाच नव्हे, तर सार्या जगाला दिलासा दिला. या संस्थेचे नामकरण हाफकिन इन्स्टिट्यूट झाले आणि नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसशी संलग्न असलेली ही संस्था महाराष्ट्राचीच नव्हे, तर भारताचे भूषण म्हणून ओळखू लागली.