kolhapur : हिप्परगी धरणाचे दरवाजे सप्टेंबरपर्यंत खुले ठेवा

माजी आमदार उल्हास पाटील यांची मागणी : ‘अलमट्टी’च्या वाढत्या उंचीलाही विरोधच
ulhas-patil-demands-hippargi-dam-gates-remain-open-till-september
हिप्परगी धरणPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे पावसाळ्याच्या सुरुवातीपासून सप्टेंबर अखेरपर्यंत खुले ठेवावेत, अशी मागणी शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना केली. तसे केल्यास शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उल्हास पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या राजापूर बंधार्‍याची तळपातळी ही 519 मीटर आहे, तर हिप्परगी धरणाची तळपातळी 512 मीटर आहे. पावसाळ्याच्या दरम्यान हिप्परगी धरणाचे दरवाजे पूर्णपणे खुले ठेवले, तर राजापूर बंधार्‍यावरून येणारे पुराचे पाणी सरळ खाली वाहून जाईल; पण कर्नाटक सरकार तसे न करता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हिप्परगी धरण 524 मीटर उंचीपर्यंत भरून घेते. परिणामी, त्याच्या बॅकवॉटरमध्ये राजापूर बंधारा बुडून जातो आणि वरून येणारे नदीचे पाणी पुढे सरकायला वाव राहत नाही. त्यामुळे हिप्परगी धरण भरले की, शिरोळ तालुक्यातील महापुराचा धोका वाढत जातो. तशातच पुन्हा ‘अलमट्टी’चे बॅकवॉटर आले की, हिप्परगीतील पाणीही पुढे सरकायला वाव मिळत नाही आणि महापुराचे सावट गडद होत जाते.

यावर उपाय सुचविताना पाटील म्हणाले, हिप्परगी धरण हे केवळ 6 टीएमसीचे धरण आहे. संपूर्ण पावसाळ्यात मिळून राजापूर बंधार्‍यावरून हिप्परगी धरणाकडे जवळपास 400 ते 450 टीएमसी पाणी वाहून जाते. त्यामुळे सप्टेबरच्या शेवटच्या एक-दोन दिवसाचे पाणी अडविले तरी हिप्परगी धरण भरून जाईल. त्यासाठी संपूर्ण पावसाळ्यातील पाणी अडविण्याची आवश्यकता नाही.

‘अलमट्टी’च्या नियोजित उंची वाढीबाबत बोलताना उल्हास पाटील म्हणाले, सध्या ‘अलमट्टी’च्या बॅकवॉटरमुळे शिरोळ तालुक्यातील गाव-शिवारांमध्ये तीन-चार आठवडे पाणी साचून राहते. ‘अलमट्टी’तील पाण्याची पातळी 517 मीटरच्या खाली गेल्याशिवाय इथले पाणी ओसरत नाही. तशातच जर ‘अलमट्टी’ची उंची 524 मीटरपर्यंत वाढविली, तर शिरोळ तालुक्याच्या गाव-शिवारांमधील पाणी ओसरायला किमान दोन महिने लागतील. दरम्यानच्या काळात गावेच्या गावे उजाड होऊन जातील आणि जवळपास आठ लाख हेक्टर शेती तर पार उद्ध्वस्त होऊन जाईल. त्यामुळे ‘अलमट्टी’च्या उंची वाढीला आमचा ठाम विरोध आहे. सरकारनेही या बाबतीत ठोस भूमिका घेऊन ‘अलमट्टी’च्या वाढत्या उंचीला विरोध करण्याची आवश्यकता आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

‘अलमट्टी’ संदर्भातील वेगवेगळ्या समित्यांच्या निष्कर्षांबाबत बोलताना पाटील म्हणाले, हा अभ्यास करण्यासाठी फार खोलात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी याबाबतीत जी काही वेगवेगळी निरीक्षणे नोंदविली आहेत, जे काही नकाशे तयार केले आहेत, त्याचे बारकाईने अवलोकन केले, तरी शिरोळ तालुक्यातील महापुराला हिप्परगी आणि अलमट्टी धरणांचे बॅकवॉटर कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे याबाबतीत रोज नव्या समित्या नेमण्यापेक्षा आहे, त्या नोंदी तपासून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही उल्हास पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.

‘अलमट्टी’ आणि ‘हिप्परगी’मुळे महापुराचा धोका..!

उल्हास पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्याला पूर किंवा महापूर नवीन नाही; पण जुन्या-जाणत्या लोकांचा कित्येक वर्षांचा अनुभव सांगतो की, आज आलेला पूर बघायला उद्या गेले, तर तोपर्यंत पूर ओसरलेला असायचा. म्हणजे पूर यायचा आणि लगेच ओसरायचाही; पण अलमट्टी आणि हिप्परगी धरण झाल्यापासून महापूर चढताना फुटा-फुटाने चढतो आणि उतरताना मात्र इंच आणि सेंटीमीटरने उतरतो. अलमट्टी आणि हिप्परगी धरणांतील पाण्याच्या फुगवट्याचा हा परिणाम आहे. गेल्या काही वर्षांत महापूर तीन-चार आठवडे थांबून राहण्याची कारणे अलमट्टी आणि हिप्परगीत दडली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news