

कोल्हापूर : राज्यातील दिव्यांगांची ऑनलाईन नोंदणी करून ‘यूडीआयडी’साठी ( स्वावलंबन कार्ड) धडपड सुरू आहे. सुमारे 80 टक्क्यांहून अधिक काम पूर्णत्वास आले आहे; मात्र अंथरुणाला खिळलेल्या दिव्यांगांची या कार्डसाठी कसरत होत आहे. त्यामुळे असे दिव्यांग बांधव यूडीआयडी कार्डपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने यावर समन्वयाने तोडगा काढण्याची गरज आहे. अंधरुणाला खिळलेल्या दिव्यांगांसाठी ‘ऑन द स्पॉट’ तपासणी करून अहवाल दिल्यास अधिक सोपे होणार आहे.
जिल्ह्यात तब्बल पन्नास हजारांहून अधिक दिव्यांग आहेत. त्यापैकी बाराशे दिव्यांग अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात आणून विविध विभागांत फिरवणे अशक्यच आहे. त्यातच आधार लिंक करताना त्यांचे थंबदेखील उठत नाहीत. अशा अनेक समस्या ऑनलाईन नोंदणी दरम्यान उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही. साहजिकच त्यांना यूडीआयडी कार्ड मिळालेले नाही. जुनी दिव्यांग प्रमाणपत्रे कालबाह्य समजली जात आहेत. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे बंद झाले आहे.
आधार कार्ड, यूडीआयडीसाठी विशेष मोहीम गरजेची
दिव्यांगांचे मतदान घराघरांत जाऊन घेतले जाते. त्याच पद्धतीने अंथरुणाला खिळलेल्या दिव्यांगांची ऑनलाईन नोंदणी करावी. त्यांना ‘ऑन द स्पॉट’ सेवा द्यावी. त्यामुळे त्यांना ‘यूडीआयडी’ (स्वावलंबन) कार्ड मिळणे अधिक सोयीचे होणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे; मात्र अनेक दिव्यांगांकडे आधार कार्डच नाही. त्यामुळे नोंदणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अंधरुणाला खिळलेल्या दिव्यांगांचे आधार कार्ड काढण्याची विशेष मोहीम राबवणे गरजेचे आहे.