Ratnagiri-Nagpur National Highway | उदगाव-चोकाक मार्गाच्या कामाला मिळेना मुहूर्त

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग : प्रशासनाकडून अद्याप मूल्यांकनाचे काम
उदगाव : येथे सध्या असलेल्या अरुंद महामार्गामुळे सातत्याने वाहतूक कोंडी व अपघाताला सामोरे जावे लागते.
उदगाव : येथे सध्या असलेल्या अरुंद महामार्गामुळे सातत्याने वाहतूक कोंडी व अपघाताला सामोरे जावे लागते. (छाया : संतोष बामणे)
Published on
Updated on

संतोष बामणे

जयसिंगपूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गांतर्गत शेवटचा टप्पा असलेल्या कोल्हापूर-सांगली मार्गातील हातकणंगले तालुक्यातील चोकाक ते शिरोळ तालुक्यातील उदगाव-अंकलीपर्यंतच्या कामाचा अद्याप ‘श्री गणेशा’ झालेला नाही. गेल्या दोन वर्षातील आंदोलनानंतर चौपट भरपाईचा निर्णय झाला आहे. सध्या जिल्हा, तालुका प्रशासनाकडून अद्याप मूल्यांकन ठरविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेवटचा टप्पा असलेल्या या 33 किलोमीटरचे काम पूर्ण करण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या 33 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी नव्याने निविदा काढली आहे. 6 एप्रिल रोजी याची तांत्रिक बीड उघडली आहे. मात्र, तांत्रिक प्रक्रिया आणि आगामी पावसाळा पाहता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला पावसाळ्यानंतरच (ऑक्टोबरमध्ये) सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महामार्ग रुंदीकरणात जमीन आणि मालमत्ता बाधित होणार्‍या शेतकर्‍यांनी व स्थानिक नागरिकांनी गेल्या वर्षभरापासून योग्य मोबदल्यासाठी मोठा लढा दिला होता. या सातत्यपूर्ण लढ्याला अखेर यश आले असून प्रशासनाने बाधितांना चौपट भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे हक्काच्या जमिनी आणि मालमत्ता गमावणार्‍या शेतकर्‍यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून सध्या या प्रकल्पांतर्गत उदगाव ते चोकाक मार्गाच्या बाधित क्षेत्राचे मूल्यांकनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या प्रकल्पासाठी चोकाक ते उदगाव-अंकली या 33 कि.मी. मार्गासाठी एकूण 1 हजार 850 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 850 कोटी रुपये महामार्ग रुंदीकरणासाठी, तर उर्वरित रक्कम भूसंपादन आणि बाधितांच्या मोबदल्यासाठी खर्च केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी विभागाकडून सध्या सुरू असलेले मूल्यांकनाचे काम पूर्ण होताच भूसंपादन आणि भरपाई वाटपाची प्रक्रिया अधिक वेगाने राबवली जाणार आहे. यानंतरच प्रात्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

उदगाव बायपाससाठी याचिका दाखल

उदगाव येथील नव्याने बायपास मार्ग 2012 साली तयार करण्यात आला. यात शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या. 2016 साली हाच महामार्ग सरळ करण्यासाठी शेतकर्‍यांच्या पुन्हा जमिनी गेल्या. असे असताना सध्या होणारा मार्ग पुन्हा नव्याने होणार असून यातही शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यामुळे किसान संघ यांच्याकडून उदगाव येथे सध्या असलेल्या बायपास महामार्गावरून होणारा मार्ग करावा यासाठी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

अपघाताचे सत्र थांबेना

सध्या असलेल्या सांगली-कोल्हापूर महामार्गावर अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. यात शेकडोजणांचे बळी गेले आहेत. विशेषत: जयसिंगपूर व उदगावात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील प्रवासी मेटकुटीला आले आहे. त्यामुळे नव्या महामार्गाच्या प्रतीक्षेत प्रवासी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news