

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात लिंबू-बाहुल्यांचा खेळ राजरोस सुरू आहेत. शिरोळ, जांभळी, नांदणी, दानोळी, दत्तवाड, अब्दुललाट, अर्जुनवाड, जयसिंगपूरसह गावागावांत भोंदूगिरीचे वर्चस्व निर्माण झाल्याने करणी-भानामतीत नागरीक अडकल्याचे चित्र आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.
जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड या तीन शहरांबरोबरच 52 गावांत लोक चळवळ, शेतकरी चळवळ, आंदोलन, न्याय व हक्कासाठी नेहमी लढा दिला जातो. अशा तालुक्यात वर्षभरापासून लिंबू-बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. जांभळी (ता. शिरोळ) येथे महिन्याभरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी जादूटोण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. बाभळीच्या झाडाला दोन महिला व तरुणाचे फोटो खिळे मारून अडकवून ठेवले होते. काळ्या बाहुल्या, बिब्बे, लिंबू आणि जादूटोणा करण्यासाठीचे साहित्य आढळल्याने नागरिकांत खळबळ उडाली होती. बारा ते तेरा नारळांना एकत्र बांधून प्रत्येक नारळाला नावांची चिठ्ठी दोर्याने बांधून हे साहित्य पूजले होते. शिरोळ येथील अर्जुनवाड रोडवरील स्मशानभूमीत असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. शिवाय कुरुंदवाड, जयसिंगपूर, दत्तवाड, अब्दुललाट, नांदणी, चिपरी, कोथळी, दानोळी यासह अन्य गावांत भोंदूगिरीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरीक व महिला करणी-भानामतीत अडकल्याचे चित्र आहे.
भोंदूंच्या नादी लागून लोक हजारो रुपये खर्ची पाडत आहेत. गावाच्या वेशीवर लिंबू, बाहुल्या, फोटो, बिब्बे, चिठ्ठ्या, दोरे, गडे, नारळ, भोपळे, कवाळ, काळ्या कपड्यांसह विविध साहित्य टाकत आहेत.