कोल्हापूर : दूध संस्थाचे ठराव घेण्यासाठी सहा. निबंधक कार्यालयात तीनशे लोकांची क्षमता असणार्या मंडपात गुरुवारी (दि. २५) दुपारी राष्ट्रवादीचे दोन हजार ठरावधारक एकत्र आले. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी झाली. ठरावधारकांमध्ये ढकलाढकली झाली अन् एकच गोंधळ उडाला. ढकलाढकलीमुळे येथे लावलेले बॅरिकेटस् हलले, वयोवृद्ध, महिला ठरावधारकांचे हाल झाले. अखेर मंत्री मुश्रीफ यांनी केलेल्या सूचनेनुसार दूध संस्थांचे तालुकानिहाय एकत्रित ठराव घेण्याची वेळ सहायक निबंधक ठाकरे यांच्यावर आली.
राष्ट्रवादीने शक्तिप्रदर्शन करत सहायक निबंधक कार्यालयात ठराव दाखल केले. येथे ठरावधारक मोठ्या संख्येने एकत्र आल्याने गोंधळ उडाला. जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनी हा प्रकार मंत्री मुश्रीफ, सहा. निबंधक ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिला. ठरावधारकांमध्ये ढकलाढकली झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान, गर्दीमुळे मडिलगे (ता. भुदरगड) येथील वयोवृद्ध ठरावधारकास चक्कर आल्याने धावपळ उडाली.
अपुर्या व्यवस्थेमुळे ठरावधारक आक्रमक झाले. परिस्थित हाताबाहेर जात असल्याचे पाहून कर्मचार्यांनी ठराव स्वीकारण्याचे काम थांबवले. अखरे मंत्री मुश्रीफ यांनी ठाकरे यांना कर्मचार्यांना तालुकानिहाय एकत्र ठराव स्वीकारण्याबाबत सूचना करण्यास सांगितले.
मंत्री मुश्रीफ यांनी ठरावधारकांना त्यांच्या तालुकाप्रमुखांकडे ठराव देण्याची सूचना केली. त्यानुसार दूध संस्थांनी त्यांचे ठराव तालुकाप्रमुखांकडे दिले. तालुकाप्रमुखांनी तालुकानिहाय सर्व ठराव एकत्र करून ते ज्या-त्या तालुक्याच्या टेबलावर जमा केले व नोंदणी झाल्यानंतर संबंधित तालुकाप्रमुखांकडे पोहोच देण्यास सांगितले. एकत्रित ठराव गोळा केल्याने वातावरण निवळले.
‘गोकुळ’साठी गुरुवारी (दि. २५) दिवसभरात तब्बल १,६५८ ठराव दाखल झाले. सहायक निबंधक कार्यालयात दिवसभर गर्दी होती. राधानगरी तालुक्यातून सर्वाधिक २७७ ठराव आले. तर आजरा १४९, करवीर २१०, कागल २७३, गडहिंग्लज १८१, चंदगड १५६, भुदरगड १४९, शिरोळ १४७, हातकणंगले ४९, शाहूवाडी ३४, पन्हाळा २८ आणि गगनबावडा तालुक्यातून ५ ठराव दाखल झाले.