

कोल्हापूर : वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी राज्यात दोन हजार ग्रंथालयांना मान्यता देण्यात येणार आहे. तसेच सध्या कार्यरत असलेल्या ग्रंथालयांच्या अनुदानात 40 टक्के वाढ करण्यात आली असून, शासकीय प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
करवीर नगर वाचन मंदिर या संस्थेला 175 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राम गणेश गडकरी सभागृहात रविवारी हा कार्यक्रम झाला. करवीर नगर वाचन मंदिर संस्थेने 175 वर्षांत सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. भविष्यात या संस्थेसाठी कधीही हाक द्या, असेही मंत्री पाटील म्हणाले. यावेळी प्रख्यात लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, वाचनसंस्कृती लोप पावत नसून, नव्या धाटणीचे वाचक घडत आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. हे चित्र नक्कीच वाचनसंस्कृती समृद्ध होत असल्याचे द्योतक आहे. याचा विचार करून ग्रंथालयांना बळ देण्याचा निर्णय राज्यस्तरावर घेण्यात आला आहे. ई लायब्ररी, संजीवनी पोर्टलवर पुस्तके उपलब्ध असून, ती आता सर्व ग्रंथालयांना विनामूल्य वापरता येणार आहेत. भडकमकर म्हणाले, ‘कनवा’ने माझे विचार, मतं घडवली. वाचक म्हणून मी या ग्रंथालयात रमायचो; मात्र माझ्यातील लेखक या संस्थेने घडवला.
यावेळी संस्थेचे कार्यवाह डॉ. आशुतोष देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी आढावा घेतला. यावेळी करवीर नगर वाचन मंदिरच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुणे विभागाच्या ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, करवीर नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, उपाध्यक्ष सदानंद मराठे, हिशोब तपासनीस दीपक गाडवे, कार्यध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे, उपकार्याध्यक्ष उदय सांगवडेकर, सहकार्यवाह मंगेश राव, मनीषा वाडीकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर अभिवाचन करण्यात आले.
करवीर नगर वाचन मंदिरच्या शतकोत्तर अमृत महोत्सवात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुशांत मगदूम यांनी आपल्या मनोगतात ग्रंथालयांच्या अडचणी मांडण्यास सुरुवात केली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाषण थांबवण्याचे सूचित केले. हा कार्यक्रम एका ग्रंथालयाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाचा आहे. त्यामुळे ग्रंथालयांच्या समस्या मांडण्याचे हे व्यासपीठ नाही, असे मंत्री पाटील म्हणाले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भडकमकर यांना मूळ गाव कोणते, असे विचारले. तेव्हा त्यांनी बारावीपर्यंत मी कोल्हापुरात होतो, असे सांगितले. मात्र, मंत्री पाटील यांना बारावी हा शब्द ‘बारामती’ असा ऐकू आल्याने हात जोडत नमस्कार केला. भडकमकरांनी मूळ गाव ‘नागपूर’ असा उलगडा करताच मंत्री पाटील यांनी गडकरी, फडणवीस यांचा उल्लेख करत कोपरखळी मारली. बारामती आणि नागपूरच्या या चर्चेने सभागृहात खसखस पिकली.