

कोल्हापूर : संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारलेल्या राजारामपुरी येथील गुन्हेगार नीलेश ऊर्फ महादेव दिलीप काळे (वय ४१, रा. यादवनगर, भीमानंद महाराज मठाजवळ, कोल्हापूर) याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने सोमवारी मुसक्या आवळल्या.
संशयिताकडून गावठी बनावटीची दोन पिस्तूल, चार काडतुसे हस्तगत करण्यात आली. उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. शस्त्र तस्करीत मध्य प्रदेश कनेक्शन उघडकीस आले आहे. गुन्हेगाराच्या एका स्थानिक साथीदाराचेही नाव निष्पन्न झाले आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या कार्यकाळात २०१९ मध्ये प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी प्रमुख मटका बुकी, एजंटासह ४४ संशयितांविरुद्ध ‘मोका’अंतर्गंत कारवाई झाली होती. त्यात नीलेश काळे याचा समावेश होता. काळे याची जामिनावर सुटका झाली आहे.
संशयिताकडे गावठी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, हवालदार वैभव पाटील यांच्यासह पथक त्याच्या मागावर होते. संशयित काळे शस्त्र विक्रीसाठी उचगाव- गडमुडशिंगी रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
झडतीत त्याच्या सॅकमध्ये दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, मोबाईल असा एक लाख ४५ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. संशयिताविरुद्ध गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेविरुद्ध यापूर्वी अमली तस्करी प्रकरणीही गुन्हा दाखल आहे. काळेने दीड वर्षापूर्वी मध्य प्रदेशातील तस्कराकडून शस्त्र खरेदी केल्याची माहिती पुढे येत आहे.