

कोल्हापूर : बिहारसह झारखंडचे गँगस्टर्स राहुल पांडे आणि प्रेम यादव यांच्यातील टोळीयुद्धात कुख्यात गँगस्टर प्रेम यादव याची हत्या करून पसार झालेल्या आणि कोल्हापुरात वास्तव्याला आलेल्या कुख्यात शार्पशूटरसह टोळीतील साथीदाराला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रोहितकुमार राजेश सिंग (वय 23), कुणालकुमार तारकेश्वर मांझी-पासवान (20, दोघेही रा. मांढररोली, जि. सारण, बिहार) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस पथकाने वेशांतर करून दोघांनाही झडप घालून जेरबंद केले.
बिहारमधील कुख्यात गँगस्टर समजल्या जाणार्या राहुल पांडे टोळीचा मास्टरमाईंड म्हणून रोहितकुमार कुख्यात आहे. खुनासह डझनाहून गंभीर गुन्ह्यांचे त्याच्यावर बिहार आणि झारखंड येथील पोलिस ठाण्यांत रेकॉर्ड आहे. प्रेम यादवसह साथीदारांनी टोळीयुद्धातून गँगस्टर राहुल पांडे याची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याचा बदला म्हणून रोहितकुमार, कुणालकुमारसह तिघांनी 18 नोव्हेंबरला झारखंड येथील धनबादच्या मध्यवर्ती चौकात गोळ्या घालून प्रेम यादव याची भरदिवसा हत्या केली. गँगस्टर प्रेम यादव याच्या हत्येनंतर बिहार आणि झारखंडमधील गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली होती. झारखंड पोलिस महासंचालकांनी हत्येच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ स्थापन केली. दोन्ही राज्यांत छापेमारी करून टोळीशी संबंधित असलेल्या सराईतांना जेरबंद केले होते. मात्र, राहुल पांडे टोळीचा म्होरक्या व शार्पशूटर झारखंड पोलिसांच्या हाताला लागला नव्हता. पांडेच्या हत्येनंतर टोळीची सर्व सूत्रे रोहितकुमार सिंग याच्याकडे आली होती. झारखंड व बिहार पोलिस त्याच्या मागावर असतानाही फरार काळात टोळीवर त्याने नियंत्रण ठेवले होते.
शार्पशूटर रोहितकुमार याच्या आई, वडिलांचे सातारा जिल्ह्यात वास्तव्य
संशयित रोहितकुमार सिंग, कुणालकुमार तारकेश्वर मांझी-पासवान यांच्या शोधासाठी झारखंड, बिहारमध्ये शंभरावर अड्ड्यांवर विशेष पथकांनी छापेमारी करूनही संशयित हाताला लागले नव्हते. मुख्य संशयित रोहितकुमार याच्या आई, वडिलांनी काही वर्षांपूर्वी बिहार येथील बस्तान गुंडाळून सातारा जिल्ह्यात आश्रय घेतल्याची माहिती झारखंड पोलिसांना मिळाली. आठवड्यापासून झारखंड पोलिसांचे पथक सातारा पोलिसांच्या संपर्कात होते. मात्र, संशयित कुटुंबीयांच्या संपर्कात आला नव्हता.
झारखंड पोलिस पथकाचा संपर्क
मुख्य सूत्रधार रोहितकुमार याचा साथीदारासमवेत सातारा, कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यांत वावर असल्याची माहिती झारखंड, बिहार पोलिसांना मिळाली. झारखंड येथील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांच्याशी संपर्क साधला. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ यांनी तांत्रिक कौशल्याचा आधार घेत शार्पशूटरचा माग शोधण्याचा प्रयत्न केला.
तामगाव, गोकुळ शिरगावसह शिरोली, शियेत लोकेशन
करवीर तालुक्यात तामगाव, शिये, शिरोली, गोकुळ शिरगाव परिसरात संशयितांचे लोकेशन आढळून आले. चारही ठिकाणी शनिवारी रात्री अकरा ते दोन वाजेपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, पथकाच्या हाती काही लागले नाही. दरम्यान, सहायक निरीक्षक सागर वाघ, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, विनोद कांबळे, रुपेश माने, अरविंद पाटील यांच्या पथकाला शिये येथील रामनगर परिसरातील हालचालींबाबत संशय आला.
अधिकार्यांसह टीममधील पोलिसांचे वेशांतर
पथकातील अधिकारी, कर्मचार्यांनी शनिवारी रात्री उशिरा वेशांतर केले. शियेतील रामनगर परिसरात बिहार आणि झारखंड येथील मजुरांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी पथकातील अधिकारी, पोलिस अंधारात आडोशाला राहून हालचालींवर नजर ठेवून होते. रात्री साडेबाराला दोन अनोळखी तरुण शिये येथील स्वागत कमानीजवळ थांबलेले दिसले.
शार्पशूटरसह साथीदाराच्या आवळल्या मुसक्या
दरम्यान, पोलिसांचा जादा फौजफाटा पाचारण करण्यात आला. शस्त्रधारी पोलिसांच्या बंदोबस्तात शार्पशूटर रोहितकुमार सिंग याच्यासह साथीदाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या. रविवारी दुपारी संशयितांना कसबा बावडा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाने दोघांचा झारखंड पोलिसांकडे ताबा देण्यात आला.
आश्रयदाते कोण याची चौकशी
बिहार आणि झारखंड पोलिसांच्या रेकॉर्डवरील मोस्ट वाँटेड गुन्हेगार रोहितकुमार सिंग व त्याच्या साथीदाराने कोणाकडे वास्तव्य केले, याचीही पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती समजू शकली नाही. पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी या कामगिरीबद्दल सुशांत चव्हाण, सागर वाघ व टीममधील पोलिसांचे कौतुक केले.