

गडहिंग्लज : गडहिंग्लज येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये 17 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जमा करणार्या आकाश रवींद्र रिंगणे (वय 28, रा. नदीवेस खोत गल्ली, गडहिंग्लज) याला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली होती.
त्यानंतर त्याच्या चौकशीत नितीन भैरू कुंभार (वय 33, रा. कुंभार गल्ली, गडहिंग्लज), अशोक महादेव कुंभार (वय 54, रा. प्रभूवाडी गल्ली, चिक्कोडी, जि. बेळगाव) दिलीप सिद्धाप्पा पाटील (वय 48, रा. बिद्रेवाडी, ता. हुक्केरी जि. बेळगाव) यांना गडहिंग्लज पोलिसांनी अटक केले होते.
यामध्ये आंतरराज्य टोळी असल्याने पोलिसांनी तपास करताना आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली. यामध्ये रविवारी सतीश बसप्पा कणकणवाडी (वय 45, रा. याडगूळ, ता. हुकेरी, जि. बेळगाव) व भरमू पुंडलिक कुंभार (वय 38, रा. बसवानगडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) या दोघांना अटक केली. यातील आरोपी सतीश कणकणवाडी याच्याकडून पाचशे रुपयांच्या 13 बनावट पोलिसांनी जप्त केल्या. यामध्ये एकूण आतापर्यंत 33 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून, ओडिशापर्यंत या प्रकरणाचे धागे असल्याने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर अधिक तपास करत आहेत.