

कोल्हापूर : कोल्हापूर- गारगोटी मार्गावर चुये (ता. करवीर) फाट्याजवळ भरधाव मोटारीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह मोटारचालकाचाही मृत्यू झाला. शिवाजी शंकर कोळी (वय 45, रा. कागल, मूळ नानीबाई चिखली, ता. कागल), मोटारचालक अतुल अरविंद पाटील (33, रा. गुडाळ, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.
वैशाली शिवाजी कोळी (45, नानीबाई चिखली, कागल), सुप्रिया केतन दळवी (वय 2 वर्षे,रा. सिध्दनेर्ली,कागल), अनिल शिवाजी जाधव (रा. धामोड, राधानगरी), विजय कृष्णांत पाटील (गुडाळ,राधानगरी), स्वप्निल बापूसाहेब पाटील (ठिकपुर्ली, राधानगरी),प्रेम संजय पाटील (गुडाळ,राधानगरी), दत्तात्रय पाटील (आवळी खुर्द,राधानगरी), बाजीराव चरापले (कौलव,राधानगरी) अशी जखमींची नावे आहेत. वैशाली कोळी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. जखमीवर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवाजी कोळी हे पत्नी, नातवासमवेत दुचाकीवरून कागलहून इस्पुर्लीमार्गे गारगोटीकडे जात होते. चुये फाट्याजवळ समोरून आलेल्या भरधाव मोटारीने जोरात धडक दिली. त्यात शिवाजी कोळी रस्त्यावर जोरात आदळले. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी वैशाली व नात उडून रस्त्याच्या एका बाजूला दूरवर फेकले गेले. चालक अतुल पाटील यांच्यासह मोटारीतील सर्वचजण गंभीर जखमी झाले.
नागरिकांनी अपघातातील जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या मोटार चालकाचा रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इस्पुर्ली पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मुद्दस्सर शेख घटनास्थळी दाखल झाले.अपघातात मोटारीसह दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. शिवाजी कोळी हे गोकूळ शिरगाव येथील एका कंपनीत कामाला होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.