kolhapur | जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व महसूल अधिकाऱ्यांचे 2 तास लोकांसाठी राखीव

सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ वेळ राखीव ठेवणे बंधनकारक; राज्य शासनाचे परिपत्रक
kolhapur |
kolhapur | जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व महसूल अधिकाऱ्यांचे 2 तास लोकांसाठी राखीव
Published on
Updated on

अनिल देशमुख

कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांपासून नायब तहसीलदारांपर्यंतचे सर्व महसूल अधिकारी आता नागरिकांना दुपारी ३ ते ५ या वेळेत त्‍यांच्‍या कार्यालयात भेटणार आहेत. नागरिकांच्या भेटीसाठी ही वेळ राखीव ठेवणे आता या अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक राहील. तसे परिपत्रकच राज्य शासनाने काढले आहे. विशेष म्हणजे या कालावधीत अन्य बैठका ठेवू नका, असेही या परिपत्रकात स्पष्ट केले गेले आहे.

दैनंदिन कामातील अडचणी, तक्रारींबाबत नागरिक अधिकाऱ्यांची भेट घेतात. मात्र, अनेकदा अधिकारीच भेटत नाहीत. दैनंदिन कामकाजामुळे या अधिकाऱ्यांना लोकांना वेळ देता येत नाही. अनेक ठिकाणी आठवड्यातील दोन दिवस दुपारी तीन ते पाच अशी नागरिकांना भेटण्यासाठी वेळ दिलेली असते. मात्र, त्या वेळेतही अधिकारी भेटत नाहीत. दुसरीकडे, दिवसभरातील कामकाजातून उपलब्ध असेल त्या वेळेत अधिकारी नागरिकांना भेटत असल्याचेही चित्र अनेक जिल्ह्यांत महसूल विभागात आहे.

काही जिल्हाधिकारी रात्री उशिरापर्यंतही नागरिकांना भेटतात. मात्र, यापुढे हे सर्वच अधिकारी सर्वच कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नागरिकांना भेटावेत, याकरिता राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. या परिपत्रकानुसार सर्व महसूल अधिकाऱ्यांनी सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ५ ही वेळ सामान्यांच्‍या भेटी व तक्रार निवारणासाठी अनिवार्यपणे राखीव ठेवावी, असे महसूल विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

मध्यवर्ती नोंदवही : कार्यालयात येणाऱ्यांच्‍या नोंदीसाठी मध्यवर्ती नोंदवही ठेवावी लागणार आहे.

सूचना फलक : राखीव वेळेचा फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वार व अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर दर्शनी भागात ठळकपणे लावणेही बंधनकारक असेल.

पूर्वकल्पना बंधनकारक : अत्यंत तातडीचे शासकीय काम, दौरा किंवा मंत्री यांच्या बैठकीमुळे अधिकारी उपस्थित राहू शकणार नसतील, तर त्याची पूर्वकल्पना सूचना फलकावर द्यावी लागेल. नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी पर्यायी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल.

कोण भेटणार?

जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार

केव्हा भेटणार?

सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत

बैठका, व्‍हीसी रद्द

या राखीव वेळेत कोणत्याही अंतर्गत बैठका, व्हीसी होणार नाहीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news