

कोल्हापूर : पुणे-बगळूर महामार्गावर झालेल्या आंदोलनामुळे शहरात पर्यायी मार्गांवरून वळविलेल्या वाहतुकीचा बोजवारा उडाला. वाहनांच्या गर्दीमुळे कसबा बावडा, सदर बाजार चौक, ताराराणी पुतळा चौक, टेंबलाई नाका, विद्यापीठ रोडवरील वाहतूक दोन तासांवर विस्कळीत झाली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह पोलिसांचा फौजफाटा आल्यानंतर साडेबारानंतर वाहतूक पूर्ववत झाल्याचे चित्र होते.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीसह घटक पक्षांनी मंगळवारी केलेल्या आंदोलनामुळे वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने महामार्गावरील सर्वच वाहने पर्यायी मार्गांवर वळविली होती. या मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश दिल्यानंतर ठिकठिकाणी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली. किणी टोल नाका, वाठार फाटा, टोप, सांगली फाटामार्गे कागलकडे जाणारी जड, अवजड वाहनांना शिये फाट्याजवळ प्रवेश बंद करण्यात आला होता. संबंधित मार्गांवरील सर्व वाहतूक शिये फाटा, कसबा बावडा, पोलिस अधीक्षक कार्यालय चौक, ताराराणी चौक, विद्यापीठ रोड, उचगाव बि—ज तसेच सरनोबतवाडी बि—ज, शाहू टोल नाकामार्गे वळविण्यात आली होती. गांधीनगरकडून तावडे हॉटेल बि—जखालून सांगली फाट्याकडे जाणार्या वाहनांना तावडे हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात आला होता. या मार्गावरील वाहने ताराराणी चौक, पोलिस अधीक्षक कार्यालय चौक, कसबा बावडा, शिये फाटामार्गे महामार्गाकडे वळविली होती.
पर्यायी मार्गांवरील बहुतांश ठिकाणी अरुंंद रस्ते आणि वर्दळ, त्यात अवजड वाहनांची भर पडल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. वाहनांचा वेगही संथ असल्याने चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पर्यायी मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहनधारकांसह नागरिकांनाही त्याची झळ सोसावी लागली. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी कसबा बावडा, ताराराणी चौकापर्यंत पाहणी केली. पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. दुपारी वाहतूक पूर्ववत झाली.