Gokul Dudh Sangh | दोन कर्मचारी होणार गोकुळचे संचालक

Gokul Dudh Sangh Kolhapur
Gokul Dudh Sangh | दोन कर्मचारी होणार गोकुळचे संचालक
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्हा सहाकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) इतिहासात प्रथमच दोन कर्मचारी आता संचालक होणार आहेत. संचालक मंडळात कर्मचारी प्रतिनिधी घेण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता केवळ शासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी मिळताच संघटनेतील वादाला तोंड फुटले. संचालक निवडीसाठी कर्मचार्‍यांना विश्वासात न घेतल्यास दुग्ध निंबधकांकडे तक्रार केली जाईल, असा इशारा कर्मचारी सुनील वाडकर यांनी पत्रकाद्वारे दिला. कर्मचारी संघटनेच्या कित्येक वर्षांच्या मागणीला आता यश मिळाले असले, तरी प्रतिनिधी नियुक्तीवरून भविष्यात वाद उफाळण्याची शक्यता आहे. संचालक मंडळात दोन कर्मचारी प्रतिनिधींचा समावेश करावा, ही दोन वर्षांपासून मागणी होती.

संघटना कागलच्या दावणीला बांधण्याचा घाट : वाडकर

कर्मचारी संघटना कागलच्या दावणीला बांधण्याचा घाट सुरू आहे. कर्मचारी संघटनेत कागलची मक्तेदारी चालू देणार नाही, असा इशारा वाडकर यांनी पत्रकाद्वारे दिला. कागलच्या प्रतिनिधीने स्वत:च्या स्वार्थासाठी संघटना विशिष्ट नेत्याच्या पायात नेऊन ठेवली आहे. ठरावीक लोकांचे मत म्हणजेच संपूर्ण कर्मचार्‍यांचे मत असे होणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.

गोकुळसंदर्भातील कागदपत्रे किरीट सोमय्या यांना सादर

गोकुळ संदर्भातील कागदपत्रे आमदार शिवाजीराव पाटील, तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे सोमवारी सादर केली. सोमय्या यांनी कागदपत्रांची तपासणी करून याबाबत आणखी काही कागदपत्रांची मागणी केली आहे, त्याचीही लवकरच पूर्तता करणार असल्याचे बेलवाडे यांनी सांगितले.

आ. पाटील यांनी गोकुळचे चेअरमन व दोन ज्येष्ठ संचालकांनी भ—ष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांची ईडीची चौकशी व्हावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. कागदपत्रांमध्ये किकवी येथील प्रकल्प खरेदी व्यवहाराचीही कागदपत्रे असल्याचे आमदार पाटील, बेलवाडे यांनी सांगितले.

गोकुळकडून माहिती देण्यास टाळाटाळ : बेलवाडे

शासनाने आदेश देऊनही गोकुळकडून मागणी केलेली माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी गोकुळच्या गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पस्थळी संचालक योगेश गोडबोले यांची भेट घेतली. माहिती मागितल्यानंतर संबंधितांना त्या माहितीची पूर्तता करण्यासाठी प्रक्रिया आहे. बेलवाडे यांनी जी माहिती मागितली, त्याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करून त्यांना माहिती देण्याची व्यवस्था गोकुळ करणार आहे, असे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news