

कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्यासाठी आता दोन दिवसांचा अवधी राहिला आहे. या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, याकरिता आता साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब सुरू आहे. मनधरणी करून, समजूत काढूनही न ऐकणार्यांवर दबावतंत्राचाही वापर केला जात आहे. याकरिता मात्र नेत्यांची अक्षरश: दमछाक सुरू आहे.
जिल्ह्यातील जयसिंगपूर या ‘ब’ वर्ग, तर गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, वडगाव, हुपरी आणि शिरोळ या ‘क’ वर्ग अशा एकूण 10 नगरपरिषदा आणि आजरा, चंदगड व हातकणंगले या 3 नगरपंचायतींसाठी दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. यामुळे राज्यात एकत्र असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीत बहुतांशी सर्वच ठिकाणी बिघाडी झाल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जांच्या वाढलेल्या संख्येने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. अनेकांनी बंडखोरी करत नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काटशहाच्या राजकारणासाठीही अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. परिणामी, स्थानिक नेत्यांची सत्तेची वाट अवघड होण्याची भीती आहे. शहराचे प्रमुख सत्तास्थान असलेल्या नगरपरिषद, नगरपंचायतीची सत्ता मिळवत वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्थानिक नेत्यांसह जिल्ह्यातील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाढत्या उमेदवारांमुळे त्यांचा सत्तेचा मार्ग अवघड होत असल्याने माघारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
दि. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्जांबाबत अपील दाखल झाले असल्यास असे अर्ज दि. 25 नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत. यामुळे माघारीसाठी काही अवधीच शिल्लक राहिल्याने नेत्यांनी सर्व नीतींचा अवलंब सुरू केला आहे. कुठे आश्वासनांची खैरात केली जात आहे, कुठे दबाव टाकला जात आहे. कुठे नातेवाईक, मित्रांना गाठून त्यांच्याकरवी मनधरणी केली जात आहे, कुठे मध्यस्थांच्या मदतीने समजूतही काढली जात आहे. कुणाला जुन्या प्रकरणांची आठवण करून दिली जात आहे, तर कोणी केलेल्या मदतीची जाणीव करून देत उमेदवारी मागे घेण्यासाठी गळ घातली जात आहे. यासाठी विविध फंडेही राबवले जात असून, नेत्यांसह निवडणुकीतील म्होरके रात्रीचा दिवस करत आहेत.