Water Supply Management | उन्हाळ्यातील पाणी कपात टाळण्यासाठी दोन दिवस उपसा बंदी

ऊसतोडणी, थंडीमुळे पाण्याची मागणी घटली; पाणी बचतीसाठी नियोजन
Water Supply Management |
Water Supply Management | उन्हाळ्यातील पाणी कपात टाळण्यासाठी दोन दिवस उपसा बंदीpudhari File photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला, तरी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन कपात लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी बचतीचे नियोजन केले आहे. ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाल्याने आणि थंडीमुळे शेतीसाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने भोगावती व पंचगंगा नदीवरील उपसा बंदी दोन दिवस लागू करण्यात आली आहे.

भोगावती नदीवरील राधानगरी धरण ते शिंगणापूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या दोन्ही तीरांवरील क्षेत्रात २२ व २३ नोव्हेंबर रोजी उपसा बंदी राहणार आहे. कसारी नदीवरील चवलज बंधाऱ्याखालील शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंतचा परिसर, तसेच कुंभी नदीवरील सांगवडे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याखालील कुंभी-भोगावती संगमापर्यंतच्या क्षेत्रातील पाणी उपशावरही बंदी लागू राहणार आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर ते शिरोळ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांदरम्यानच्या दोन्ही तीरांवरील क्षेत्रात २३ व २४ नोव्हेंबर रोजी उपसा बंदी लागू असेल. नदीपात्रासह ओढे व नाल्यांवरील पाणी उपसा यंत्रणांनाही या बंदीचे पालन करावे लागणार आहे. महावितरणकडून दर सोमवारी वीज दुरुस्तीची कामे केली जात असल्याने त्या दिवशी उपसा यंत्रणा बंद असतात. या नियमित बंदला लागून केवळ एक दिवस उपसा बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सलग मोठ्या कालावधीसाठी पाणी बंद ठेवावे लागणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.

उपसा बंदीच्या कालावधीत अनधिकृतपणे पाणी उपसा केल्यास संबंधित यंत्रणा जप्त करून परवानाधारकाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. तसेच या कालावधीत होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.