

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांकडून अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2 कोटी 6 लाख 26 हजार 821 रुपयांचे दान करण्यात आले आहे. एप्रिल व मे महिन्यातील उन्हाळी सुट्टीत देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून आलेल्या लाखो भाविकांनी मंदिराच्या दानपेटींत भरभरून दान दिले आहे. मंदिरातील दान पेट्यांची मोजदाद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सोमवारपासून सुरू होती. चार दिवसांच्या कालावधीत एकूण 10 दानपेट्या मोजण्यात आल्या. सर्वाधिक देणगी मदत पेटी क्रमांक 2 मध्ये मिळाली. यात 72 लाख 9 हजार 229 रुपयांची मोजदाद झाली.
उन्हाळी सुटीचा कालावधी संपण्यास अवघ्या आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला असला तरी भाविकांची संख्या वळीव पाऊस व वार्यामुळे कमी झाली आहे. शिवाय शाळा-महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचाही परिणाम पर्यटक-भाविकांच्या संख्येवर जाणवून लागला आहे. शुक्रवारी (दि. 23) 69 हजार 106 भाविकांनी तर शनिवारी (दि. 24) सुमारे 50 हजार भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांना पावसापासून बचावासाठी देवस्थान समितीने मंदिर परिसरात पत्र्याचे शेड उभारले आहे.
पेटी क्र. 1 : 51 लाख 40 हजार 843 रुपये
पेटी क्र. 2 : 72 लाख 9 हजार 229 रुपये
पेटी क्र. 3 : 6 लाख 79 हजार 921 रुपये
पेटी क्र. 4 : 2 लाख 91 हजार 209 रुपये
पेटी क्र. 5 : 1 लाख 86 हजार 213 रुपये
पेटी क्र. 6 : 3 लाख 7 हजार 698 रुपये
पेटी क्र. 7 : 45 लाख 51 हजार 572 रुपये
पेटी क्र. 8 : 4 लाख 37 हजार 597 रुपये
पेटी क्र. 11 : 14 लाख 30 हजार 442 रुपये
पेटी क्र. 12 : 3 लाख 92 हजार 96 रुपये
एकूण : 2 कोटी, 6 लाख, 26 हजार 829 रुपये