

सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथे भावाभावांतील अतूट प्रेमाचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. गावातील दोन सख्ख्या भावांचा अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बळवंत गोविंद पाटील (वय 98) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. विशेष म्हणजे त्यांच्या लहान भावाचा, सदाशिव गोविंद पाटील (वय 93) यांचा दोन आठवड्यांपूर्वीच हृदयविकाराने मृत्यू झाला होता. नुकतेच त्यांचे उत्तरकार्य झाले असताना बळवंत पाटील यांचेही निधन झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हे दोन्ही बंधू बैलगाडीच्या माध्यमातून दगड, विटा, लाकूड आणि माती यांची वाहतूक करून अनेकांच्या मदतीला धावून जात असत. त्यांच्या कामामुळे अनेक घरांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. साधी राहणी व कष्टाळू आयुष्य जगणारे हे बंधू वारकरी संप्रदायातही सक्रिय होते. आषाढी आणि कार्तिकी वारीत त्यांचा उत्साहाने सहभाग असायचा. बळवंत पाटील यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, मुली, सुना नातवंडे तर सदाशिव पाटील यांच्या मागे मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.