

कोल्हापूर : परिसरात दहशत माजविण्यासाठी कुऱ्हाडीच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना राजारामपुरी पोलिसांनी रविवारी अटक केली. रविवारी दुपारी या दोघांचा माज उतरविण्यासाठी तोडफोड केलेल्या परिसरातून पोलिसांनी त्यांना फिरवले. तसेच हात जोडून परिसरातील नागरिकांची माफी मागण्यास सांगितले. गौरव ऊर्फ सोन्या संतोष वडर (वय २६) व लक्ष्मण ऊर्फ देवराज संतोष वडर (२०, रा. तीनबत्ती चौक, दौलतनगर) अशी त्यांची नावे आहेत.
संशयित वडर बंधू मेंढपाळ म्हणून काम करतात. दौलतनगर येथील नागरिकांसोबत त्यांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यातूनच आपल्या विरोधात नागरिक तक्रार करतील या समजुतीने शनिवारी पहाटे या दोघांनी कुऱ्हाडीच्या सहाय्याने पाच वाहनांना लक्ष केले. दोन मोटारी, तीन दुचाकींची तोडफोड करून १ लाखांचे नुकसान केले. शनिवारी दुपारी याप्रकरणी सचिन पाटील यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याची दखल घेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांचा माग काढत गोकुळ शिरगावमधून त्यांना अटक केली.
२४ तासांत हात जोडून माफी
संशयित वडर बंधूंनी शनिवारी सकाळी परिसरातील वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी रविवारी सकाळी ११ वाजण्यापूर्वीच या दोघांना घटनास्थळावरून फिरवले. अवघ्या २४ तासांत राजारामपुरी पोलिसांनी घेतलेल्या या ॲक्शनमुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमलदार शाहू तळेकर, कृष्णात पाटील, मिलिंद बांगर, विशाल शिरगावकर, सचिन वायदंडे, नितीश बागडी, अमोल पाटील व गजानन हराळे यांनी ही कारवाई केली.