

कोल्हापूर : देशात घुसखोरी करून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या दोघा बांगला देशी नागरिकांना न्यायालयाने तीन वर्षे आठ महिने सक्तमजुरी सुनावली होती. शिक्षा पूर्ण होताच कोल्हापूर पोलिसांनी या दोघांनाही आसाम येथे बीएसएफ जवानांच्या ताब्यात देऊन देशातून हद्दपार केले. सोहेल कलाम मुल्ला ऊर्फ मोहम्मद इनामुल फकीर (वय ३०, रा. जीकरगाछा) व सुमैया बादशाह मुल्ला (२३, रा. नोडाई) अशी त्यांची नावे असून, जानेवारी २०२३ मध्ये ते गांधीनगर परिसरात राहत होते.
गांधीनगरचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले यांच्यासह पथकाने या दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ वर्षे ८ महिने सक्तमजुरीसह १० हजार दंड सुनावला होता. कळंबा कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर दंडाची रक्कम न भरल्याने त्यांच्या शिक्षेत वाढ केली होती. १८ नोव्हेंबर रोजी शिक्षा संपल्यानंतर गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना बीएसएफ जवानांच्या ताब्यात दिले. तेथून बांगला देशला पाठविले.