

CPR Hospital Doctor Extortion
कागल: कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात असलेल्या महिला डॉक्टर यांच्या विरोधात तसेच अजिंक्य पाटील यांच्याही विरोधात माहितीच्या अधिकाराखाली वारंवार देत असलेले अर्ज थांबविण्यासाठी 15 लाखांची खंडणी मागितली. ही खंडणी स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात जयराज भीमराव कोळी (वय 43, रा. 280 हॉकी स्टेडियमजवळ, नेहरूनगर, कोल्हापूर) व युवराज मारुती खराडे (रा. हर्ष रेसिडेन्सी प्लॉट क्रमांक 12, उचगाव, ता. करवीर) यांना अटक केली आहे.
ही घटना कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ रात्री उशिरा घडली आहे. यातील फिर्यादी अजिंक्य अनिल पाटील हे वैद्यकीय उपकरणे पुरवठा करण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नी सीपीआर हॉस्पिटलमध्ये बॉण्ड प्रमाणे एमडी डॉक्टर म्हणून सण 2024 ते मार्च 2025 पर्यंत कार्यरत होत्या.
यातील संशयित आरोपी जयराज कोळी यांनी फिर्यादी अजिंक्य पाटील तसेच त्यांची एमडी डॉक्टर पत्नी यांच्या नावाने वारंवार अर्ज करून त्यांना त्रास देत होते तसेच आरोपी कोळी यांनी अजिंक्य पाटील व त्यांच्या पत्नीच्या नावे वारंवार केलेले खोटे अर्ज व त्रास देणे थांबवण्यासाठी कोळी यांचा मित्र संशयित आरोपी युवराज खराडे यांनी संगणमत करून अजिंक्य पाटील यांच्याकडे 20 लाखांची खंडणी मागितली होती. हे पैसे अजिंक्य पाटील यांनी त्यांना दिल्यानंतर दिलेले अर्ज व तक्रारी माघार घेतो. व पुन्हा त्यांना त्रास देणार नाही, असे सांगून फिर्यादी अजिंक्य पाटील यांनी त्यांना पैसे न दिल्यास अशाच प्रकारे त्रास देऊन राज्यात कोठेही व्यवसाय करू न देण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर फिर्यादी अजिंक्य पाटील यांनी अंतिम चर्चा करून वीस लाखांवरून पंधरा लाख रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम कागल येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या मार्गावर असलेल्या पेट्रोल पंप येथे संशयित आरोपी पंधरा लाख रुपये खंडणी स्वीकारत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले आणि दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मोबाईल हँडसेट, कार असा एकूण 5 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत.