

कोल्हापूर : कोल्हापूर-गारगोटी एस.टी.मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशाच्या पर्समधील 5 लाख 30 हजारांचे दागिने हातोहात लंपास करणार्या कराड तालुक्यातील कारवे येथील दोन महिलांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
शुभांगी भगवान पोवार (वय 33), मंजुळा सुनील पवार (32, रा. कारवे, ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत. धनश्री सदाशिव पाटील (25, रा. भोईसर, मुंबई, मूळ मडिलगे, ता. करवीर) यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली.
मुंबईला वास्तव्याला असलेल्या धनश्री पाटील या गुरुवारी सकाळी कोल्हापुरात आल्या होत्या. मूळ गाव असलेल्या मडिलगेकडे जाण्यासाठी येथील मध्यवर्ती बसस्थानकावर लागलेल्या कोल्हापूर-गारगोटी एस.टी.मध्ये त्या चढत असताना संशयित महिलांनी पर्समधील सोन्याचे दागिने असलेली डबी लंपास केली.
चोरीचा प्रकार लक्षात येताच धनश्री पाटील यांनी एस.टी. चालक, वाहकांकडे तक्रार केली. वाहकाने एस.टी.मधील अन्य प्रवाशांना संबंधित महिलेच्या दागिन्यांची चोरी झाली आहे, चुकून कोणाकडे आले आहेत का पाहा, अशी विनंती केली. मात्र, कोणाकडूनही दाद मिळाली नाही. शेवटी चालकाने एस.टी. बस शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या दारात आणून थांबविली.
पोलिस निरीक्षक संतोष डोके, गुन्हे प्रगटीकरण पथकाने एस.टी.मधील सर्वच प्रवाशांकडे चौकशी करून झडती घेतली. चोरीला गेलेल्या दागिन्यांची डबी शुभांगी पोवार व मंजुळा पवार यांच्याकडे सापडली. संशयितांकडून तीन तोळ्यांचे गंठण, दीड तोळ्याचे मंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुमके, अर्धा तोळ्याचा वेल, अडीच ग्रॅम वजनाची फुले, कानातील सोन्याच्या तारा असे दागिने हस्तगत केले. संशयित महिलांना अटक करण्यात आली आहे.