

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरामध्ये आकाश रवींद्र रिंगणे याने 17 जून रोजी अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये 500 रुपयांच्या 35 बनावट नोटा भरल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा गडहिंग्लज पोलिसांनी अतिशय सूक्ष्मपणे तपास सुरू केला. या प्रकरणाचे धागेदोरे बांगला देशपर्यंत निघाल्याने गडहिंग्लज पोलिसांनी थेट बांगला देश हद्दीपर्यंत धडक मारली असून, ज्या ठिकाणी या बनावट नोटांची बांगला देशमधून आयात होते, त्या मालदा येथे जाऊन दोन आरोपींना अटक केली आहे. मलिक अफसरअली शेख (वय 32), टोनी जहरुद्दीन शेख (23) दोघेही रा. परसुजापूर, पो. नयनसुख, ता. फराका, जि. मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
सुरुवातीला आकाशला अटक केल्यानंतर त्याच्याकडून नितीन कुंभार व अशोक कुंभार यांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर दिलीप पाटील, सतीश कणकणवाडी, भरमू कुंभार, अक्षय कुंभार यांच्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदारे पोहोचले. यातील मुख्य आरोपी अशोक कुंभार याची यातील बनावट नोटा तस्करी करणार्या आरोपींशी तुरुंगात ओळख वाढल्याने त्यातून ही बनावट नोटांची तस्करी झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. टोनी व मलिक हे दोघे मित्र असून, टोनीचे वडील जहरुद्दीन व अशोक कुंभार यांची बंगळुर येथील तुरुंगात ओळख झाली. यातूनच ही बनावट नोटांची तस्करी सुरू झाली.
या दोघांसोबत ओडिशामधील आरोपी तापसकुमार प्रधान हा देखील समाविष्ट असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल या तीन राज्यांत या बनावट नोटांचे धागेदोरे पोहोचले. त्यामुळे गडहिंग्लज पोलिसांना या प्रकरणी या तिन्ही राज्यांमध्ये जाऊन आरोपींना अटक करावी लागली. अजूनही या प्रकरणात पोलिसांना चार आरोपी हवे असून, त्यानंतर या प्रकरणाचा शेवटचा टप्पा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर पाटील, पोलिस उपनिरीक्षक रमेश मोरे, हवालदार रामदास किल्लेदार, दादू खोत, अरुण पाटील, युवराज पाटील, प्रशांत शेवाळे यांच्या पथकाने यामध्ये काम केले.
या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या बनावट नोटा बांगला देशमध्ये छापल्या जातात. सीमेवर पार्सल स्वरूपात पलीकडून फेकल्या जातात. या नोटा हे आरोपी ताब्यात घेऊन हस्तकांमार्फत थेट बेंगळूरपर्यंत पोहोचवत होते. त्यातून मग अन्य ठिकाणी याचे वितरण केले जात होते.
बनावट नोटा चलनात आणण्यासाठी यातील आरोपींना 1 लाखांच्या नोटा खपविल्यानंतर 60 हजार रुपये मिळत होते. यातील बहुतांश पैसे हे ऑनलाईन पद्धतीने खात्यावर जात होते. सुरुवातीला केवळ या बनावट नोटा ताब्यात घ्यायच्या व खपल्यानंतर 40 हजार रुपये संबंधिताला पाठवायचे, अशी यंत्रणा कार्यरत होती. म्हणजे एक लाख मूल्याच्या बनावट नोटा 40 हजारात मिळत होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
दहा संशयितांकडून ऑनलाईन जवळपास 16 लाख 88 हजार रुपये इतकी रक्कम व्यवहारात आली आहे. याचा हिशेब केला तर जवळपास 35 लाख रुपयांच्या बनावट नोटा याच दहा जणांकडून चलनात आल्या आहेत. त्यामुळे जर रिंगणे हा एटीएममध्ये पैसे भरताना सापडला नसता तर अजून किती दिवस या नोटा चलनात आल्या असत्या, असा सवाल उपस्थित होत आहे.