

अर्जुनवाडा : तुरंबे (ता.राधानगरी) येथील स्पर्श लॉजिंग बोर्डिंग फार्म हाऊसवर राधानगरी पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये एक पीडित महिला, लॉज मालक आणि मॅनेजर अशा दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
लॉज मालक शहाजी पिराजी कुंभार (वय ३५, रा. तुरंबे) आणि मॅनेजर श्रीधर दिनकर पाटील (वय ५५ रा. कपीलेश्वर ता. राधानगरी) अशा दोन संशयिताना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईची माहिती मिळताच शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आप्पासो पोवार यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर अनेक लॉजवर स्वतःच्या फायद्याकरीता गरीब आणि असहाय महिलेचा गैरफायदा घेवून तिला पैशाचे आमिष दाखवून, आर्थिक लाभ मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून अनैतिक व्यापार करणेसाठी महिलांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून अशा व्यवसायावर कठोर कारवाई व्हावी, आणि सर्वच लॉजची चौकशी व्हावी, अशी ही मागणी नागरिकांच्यामधून होत आहे.
तालुक्यातील अवैध व्यवसायांबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. तसेच सरवडे ग्रामस्थांनी गांजा ओढणाऱ्यांची गावातून धिंड काढण्याचा निर्णय घेतला असून इतर गावाने ही तसा निर्णय घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी केले आहे.