

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्राचीन कोपेश्वर मंदिराच्या शिखरावर झाडे उगवली आहेत. त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भाविकांबरोबरच इतिहास अभ्यासकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्राचीन काळातील हे मंदिर शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. शिखरावरील दगडी कलाकुसर हे या वास्तूचे प्रमुख आकर्षण आहे. विविध देव-देवतांची नक्षी, शिल्परचना आणि कोरीव काम यामुळे हे मंदिर पर्यटक, अभ्यासक आणि भक्त यांचे प्रमुख आकर्षण ठरते. मात्र, शिखरावर गवत, झुडपे आणि झाडे उगवून त्यांची मुळे दगडी फटीत खोलवर शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शिल्पांमध्ये तडे पडून कळसाची मूळ रचना धोक्यात येण्याची शक्यता आहे.
इतिहासकार आणि शिल्पकला अभ्यासकांनी याबाबत वारंवार लक्ष वेधले असले, तरी भारतीय पुरातत्त्व विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. नियमित स्वच्छता, देखभाल आणि शिल्पसंवर्धनाच्या कोणत्याही कामाची येथे दखल घेतली जात नाही. परिणामी, महाराष्ट्राच्या अमूल्य सांस्कृतिक वारशाचा र्हास होत आहे. स्थानिक नागरिक, मंदिर समिती व अभ्यासक यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मंदिराला युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्याबाबत चर्चा होत असताना प्रत्यक्षात त्याच्या जतनाचीच फजिती होत आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. कळसावरील झाडे-झुडपे तातडीने काढावीत. शिल्पांची शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छता करावी आणि मंदिर परिसराची नियमित देखभाल करावी, अशी मागणी इतिहास अभ्यासकांकडून होत आहे.