

विशाळगड, सुभाष पाटील: विशाळगड मार्गावरील पांढरेपाणी ते मालाईचा धनगरवाडा दरम्यान रस्त्यावरच गुरूवारी (दि.१७) मध्यरात्री एक मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेमुळे शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह सामान्य प्रवाशांचेही मोठे हाल होत आहेत. बसमधील प्रवाशांनी झाड बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र झाडाच्या मोठ्या आकारामुळे त्यांना यश आले नाही.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर वटलेली आणि कमकुवत झालेली झाडे कोसळण्याच्या घटना नित्याच्याच बनल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. आधीच खड्डेमय असलेल्या या रस्त्यावर वाहने सावकाश चालवावी लागतात, त्यात आता झाडे पडण्याच्या सततच्या धोक्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून वारंवार मागणी होत आहे की, संबंधित विभागाने या मार्गावरील धोकादायक वटलेली झाडे त्वरित तोडून टाकावीत, जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.