CPR hospital | ‘सीपीआर’मध्ये उपचार मोफत, पाणी मात्र घ्यावे लागते विकत

कोल्हापूर : सीपीआरच्या हृदय शस्त्रक्रिया विभागासमोरील आधारवड असलेले पाण्याचे एटीएम.
कोल्हापूर : सीपीआरच्या हृदय शस्त्रक्रिया विभागासमोरील आधारवड असलेले पाण्याचे एटीएम. (छाया : नाज ट्रेनर)
Published on
Updated on

एकनाथ नाईक

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय ( सीपीआर) पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय म्हणून ओळखले जाते. अत्याधुनिक उपचार, तज्ज्ञ डॉक्टर आणि कमी खर्चातील वैद्यकीय सेवा यामुळे हजारो रुग्णांचे सीपीआर आधारवड आहे. पण रुग्णालयातील 32 वॉर्डसह आस्थापना कार्यालयात पिण्याच्या पाण्याची मूलभूत सुविधा नाही. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टरांसह कर्मचार्‍यांचे पाण्यासाठी हालहाल सुरू असून घशाला कोरड पडली आहे. अनेकवेळा विकत पाणी घ्यावे लागते. प्रशासनाने मुबलक व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.

सीपीआर येथे कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा तसेच सीमाभागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. बाह्यरुग्ण विभाग, तपासण्या, औषधोपचार, शस्त्रक्रिया, रुग्णांना भेटण्यासाठी आणि कामांसाठी सुमारे पाच ते सहा हजार नागरिक नियमित ये-जा करत असतात. 1500 ते 1700 रुग्ण हे बाह्यरुग्ण विभागात येत असतात. त्यापैकी 100 ते 150 रुग्णांना पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. त्यांच्यासमवेत एक-दोन नातेवाईक रुग्णालयात थांबून असतात. रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने पाण्याच्या एटीएमवरून पाणी घ्यावे लागत आहे.

अपघात विभागाबाहेर ओसवाल कुटुंबीयांनी मोफत पिण्याच्या पाण्याची तर हृदय शस्त्रक्रिया विभागाबाहेर कॉलेजच्या युवतींनी पाण्याची एटीएम सुविधा सुरू केली आहे. त्यावर सीपीआरमधील सर्वजण तहान भागवत आहेत. वॉर्डात कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने घशाला कोरड पडू लागली आहे. एटीएममधून पाणी मिळवण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी परिसरात पायपीट करावी लागत आहे. वैद्यकीय सेवेत असणार्‍या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांनाही विकतचे पाणी प्यावे लागत आहे. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना उपचार सोडून पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. तीव— उन्हाळा सुरू होताच येथील पाणी परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष

सीपीआरमध्ये उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा अत्याधुनिक असल्या तरी पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष झाले आहे. रुग्णांच्या उपचारासाठी धावपळ करणार्‍या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांचा जीव तहानेने व्याकूळ झाला आहे. ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे.

वॉर्डात पाण्याची सुविधा हवी

रात्री-अपरात्री पिण्याच्या पाण्याची गरज भासली तरी नातेवाईकांची अडचण होते. त्यामुळे सीपीआरच्या प्रत्येक विभागात स्वच्छ आणि मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. प्रशासनाने तातडीने फिल्टर, कूलर किंवा आरओ यंत्रणा बसवून नागरिकांची तहान भागवावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news