चार कोटी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ३७% नोकऱ्यांची संधी
देविदास लांजेवार
कोल्हापूर : उगवते 2025 हे नववर्ष मानवी जीवनात क्रांतिकारी बदल घडविणारे असणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने संपूर्ण भारतभर 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर्ष असेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे नववर्षात भारतीयांच्या प्रत्येक क्षेत्रात इतके आमूलाग्र बदल झालेले असतील की, प्रत्येकाला कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेला कायाकल्प अविश्वसनीय वाटेल. ए.आय.मुळे तंत्रशिक्षण परिषदेशी संलग्न 14 हजार विद्यालयांतील चार कोटी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाईल. यामुळे उद्योग क्षेत्रात 37 टक्के नोकर्या आणि रोजगार उपलब्ध होतील. परिषदेने घोषित केलेले 2025 हे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष भारताच्या प्रबळ तांत्रिक प्रवासातील मैलाचा दगड ठरणार आहे.
2025 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्या ‘टर्मिनॉलॉजी’ला (शब्दावली) जन्म देईल. त्यात पायथन, आर, मशिन लर्निंग फ्रेमवर्क, टेबल्यू, पॉवर बीआय, बिझनेस अॅनालिटिक्स टुल्स, क्वाँटम कम्प्युटिंग, न्युरल नेटवर्क्स जनरेटिव्ह एआय, जेमिनी आणि बरेच काही.
‘एआयसीईटी’शी संलग्न 14 हजार विद्यालयांतील चार कोटी विद्यार्थ्यांना ‘एआय’चे शिक्षण देणार.
या शिक्षणाचा वापर मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात करणार. कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी जागरुकता मोहीम राबविणार.
प्रचलित अभ्यासक्रम अद्ययावत करून त्यात आंतरराष्ट्रीय द़ृष्टिकोनातून कृत्रिम बुद्धिमत्तेचे विषय समाविष्ट करणार.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देता यावेत यासाठी प्राध्यापकांसाठी कौशल्यवृद्धी कार्यशाळा घेणार.
‘एआय’शी संबंधित उद्योगधंद्याशी भागीदारी (एमओयू) करून प्रशिक्षण देणार. याद्वारे एकूण रोजगाराच्या 37 टक्के नोकरीच्या संधी मिळणार.
वैद्यकक्षेत्रात रोबोटिक सर्जरी आणि ‘एआय’मुळे अचूक निदान करणे शक्य होणार. परिणामी आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार.
कृषी क्षेत्रात ‘एआय’ आधारित सिंचन व्यवस्थेद्वारे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन होणार. पिकांवरील रोग तत्काळ ओळखणार. पीक उत्पादनाचे वितरण, देशभरातील बाजारभाव एका क्लिकवर मिळणार. वितरण, व्यवस्थापन अन् मार्केटिंग प्रभावी होणार.

