

कागल : स्पर्धा परीक्षेचा पेपर देऊन वडिलांसोबत घरी परत येत असलेल्या महिलेचा अपघातात जागीच मृत्यू झाला. सौ. पल्लवी राहुल पाटील (वय 30, रा. मौजे सांगाव, ता. कागल) असे त्यांचे नाव आहे. त्यांचे वडील सतीश हिरुगडे (रा. कागल) किरकोळ जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी कागल येथील महामार्गावरील लक्ष्मी मंदिर चौकात घडली.
सतीश हिरुगडे रिक्षाचालक असून मुलीला मोपेडवरून (एमएच 09 एफसी 6325) शिये येथील स्पर्धा परीक्षा केंद्रावर घेऊन गेले होते. परीक्षा संपल्यानंतर दोघे कागलकडे येत असताना भरधाव ट्रकने मोपेडला जोरदार धडक दिली. यात पल्लवी ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या, तर सतीश हिरुगडे बाजूला फेकले जाऊन जखमी झाले.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या अपघातामुळे काही काळ दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, सतीश हिरुगडे हे गेली अनेक वर्षे महामार्गावर अपघातग््रास्तांना आपल्या रिक्षातून मोफत रुग्णालयात पोहोचवण्याचे सामाजिक कार्य करत होते. त्यांच्या कुटुंबावरच आज दुःखाचा डोंगर कोसळला. मृत पल्लवी पाटील यांच्या मागे दोन लहान मुले असून, या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.