

नवे पारगाव : वाठार-वारणानगर राज्य मार्गावरील नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत छोट्या पुलाचे काम सुरु आहे. मंगळवारी विवाह मुहूर्त असल्याने रस्त्यावर मोठी गर्दी होती; मात्र कंत्राटदाराने काम मध्येच सुरु केले आहे. शिवाय वाहतुकीचे योग्य नियोजन केले नसल्याने दिवसभर वाहतुकीची मोठी कोंडी होऊन प्रवाशांना नाहक त्रास झाला. दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारास वाहन मागे पुढे घेण्यावरून मोठा वाद होऊन हाणामारीचा प्रकार घडला.
रस्त्यावर एका बाजूला मुरुमाचे ढिग तर दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या मध्येच पोकलँडचे काम सुरु होते. सध्या रस्त्याची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. मात्र आज दिवसभर विवाह मुहूर्त असल्याने वाहनांची मोठी वर्दळ होती. शिवाय नेहमीची अवजड वाहने, ऊस वाहतुकीस इतर लहान-मोठ्या अनेक वाहनांतून नागरिक प्रवास करत असल्याने दिवसभर वाहतुकीची कोंडी झाली होती. दुपारी दोनच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही तरुण रस्त्यावर उतरले. यावेळी वाहनातून लग्नासाठी वाठारकडे जाणाऱ्या तरुणांची वाहतुक कोंडीवरून गाडी मागे-पुढे करण्यावरून बाचाबाची होऊन हाणामारीचा प्रकार घडला.
यावेळी दगडफेकही झाली. यामध्ये एक तरुण जखमी झाला. यावेळी एकच गोंधळ उडाला. यावेळी तत्काळ वडगाव पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगविला व जखमीची चौकशी केली. हाणामारी करणारे माले येथील असल्याचे समजते.दरम्यान, वडगाव पोलिसांनी या परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू होते. याबाबतची नोंद अद्याप पोलिसांत झालेली नाही.