

Balumama Amavasya Yatra in Adamapur
मुदाळतिट्टा : प्रा.शाम पाटील
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर ता. भुदरगड येथील बाळूमामा देवालयाच्या दि.27 रविवार अमावस्या यात्रेवेळी सुमारे चार ते पाच तास वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे पोलीस प्रशासन व देवस्थान समिती विरोधात भाविकांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे.
प्रत्येक अमावस्या यात्रेला वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीला भक्तांना सामोरे जावे लागत असताना प्रशासनाच्यावतीने कोणतीही दखल अथवा उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होताना दिसत आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग येणार का? पोलीस यंत्रणा सतर्क होणार का असा संतप्त सवाल केला जात आहे.
राधानगरी-निपाणी रस्त्यावर मुरगूड-मुदाळतिट्टा सात किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागून राहिल्या होत्या. भंडारा यात्रेला एकेरी वाहतुकीचे जे नियोजन केले होते ते नियोजन अमावस्या यात्रेला केले असते तर वाहतुकीची कोंडी झाली नसती. आदमापूर येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला तसेच मुदाळतिट्टा ते निढोरी दरम्यान असणाऱ्या तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडतो येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहतूकच करता येत नाही. यामुळे या कोंडीचा सामना भाविकांना करावा लागतो. मंदिराजवळ वाहनतळ असताना देखील भाविकांकडून रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जातात. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
राधानगरी-निपाणी रस्ता नव्यानेच करण्यात आला आहे. हा रस्ता करत असताना मुदाळतिट्टा ते निढोरी या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे होते. पण रुंदीकरण ऐवजी रस्ता अरुंदच झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या गटारावर उंचवटा निर्माण केल्याने वाहने उभी करण्यासाठी मिळत असलेली दोन फूट जागा पुन्हा कमीच झाली आहे. याचा फटका वाहतुकीला होत आहे.
येथे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रशासनासमोर उभा आहे, पण हा रस्ता नव्याने होत असताना संबंधित अधिकारी वर्गाच्या ही गोष्ट लक्षात न येणे ही आश्चर्यजनक बाब असल्याचे भाविक बोलत आहेत. भविष्यात येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असणार असल्यामुळे पुन्हा याच समस्येला सामोरे जावे लागेल यात शंका नाही.
सकाळी झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे भक्तांसह बाहेरगावी उद्योग, व्यवसाय नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवासी व बिद्री, गारगोटी ,मुरगुड, सरवडे, मुदाळ तिट्टा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फटका बसला आहे. पूर्वी गारगोटी पोलीस ठाण्याहून वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत होता, पण सध्या यामध्ये थोडी कमतरता असल्याचे दिसून येत आहे. देवस्थान समिती यावर कोणती उपाययोजना करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. राधानगरी गारगोटी मार्गे निपाणीकडे जाणारी वाहने मुदाळतिट्टा, हुतात्मा स्वामी वारके सुतगिरणी, वाघापूर, मार्गे निढोरी अशी एकेरी वाहतूक व्यवस्था दर महिन्याच्या अमावस्याला सुरू करणे गरजेचे आहे. आगामी काळात हा रोड येथील वाहतुकीच्या कोंडीवर एक पर्यायी मार्ग असल्याने या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
देवस्थान समितीच्यावतीने सध्या असलेली पार्किंग व्यवस्था ही अपुरी आहे. त्यामुळे भविष्यात भाविकांना आपली वाहने पार्क करता येतील यासाठी मंदिराच्या दोन्ही बाजूस प्रशस्त पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध करणे हेच ध्येय देवस्थान समितीला समोर ठेवावे लागणार आहे. सध्या आदमापूर मुदाळ परिसरात जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जागा खरेदी करणे व मिळवणे हा मोठा प्रश्नच निर्माण होणार आहे. काही ठिकाणी खासगी पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे, पण तेथे वाहने पोहोचणे कठीण होत असल्याने ती रिकामीच राहतात.