कोल्हापूर : शिवाजी पुलाजवळ एसटी बंद पडल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबेवाडी, केर्ली दरम्यानची वाहतूक सोमवारी दुपारी दोन तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती. रणरणत्या उन्हात वाहतूक विस्कळीत झाल्याने दुचाकीस्वारांसह महिलांना पायपीट करावी लागली. महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह लक्ष्मीपुरी पोलिसांनी एसटी हलविल्याने दुपारी वाहतूक पूर्ववत झाली.
शिवाजी पुलापासून काही अंतरावर सोमवारी दुपारी एसटी बंद पडल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. कालांतराने दोन्ही बाजूला अवजड वाहनांच्या रांगा लागल्याने संपूर्ण वाहतूक यंत्रणाच ठप्प झाली. टाऊन हॉल, जुना बुधवार पेठ, सिद्धार्थ चौकापासून आंबेवाडी, केर्लीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्यासह त्यांचा फौजफाटा दाखल झाला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बंद पडलेली एसटी हलविण्यात आल्यानंतर दुपारी वाहतूक पूर्ववत झाली.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविक, पर्यटकांची कोल्हापूरसह जोतिबा, पन्हाळ्यावर तोबा गर्दी झाली आहे. सोमवारी सकाळपासून कोल्हापूर- जोतिबा, पन्हाळा रस्ता वाहनांनी गजबजला होता. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने भाविक, पर्यटकांसह दुचाकीस्वारांना कसरत करावी लागली. त्यात रणरणत्या उन्हामुळे लहान मुलांसह महिलांना त्रास सोसावा लागला.