

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 1 टक्का नियमन (सेस) कराविरोधात कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने केली. ‘रद्द करा, रद्द करा, मार्केट सेस रद्द करा’ आणि ‘जीएसटी कायदा सुटसुटीत करा’ अशा घोषणांनी व्यापार्यांनी परिसर दणाणून सोडला.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशनसह संलग्न संघटनांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या वतीने तहसीलदार स्वप्निल पवार यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात 5 टक्के जीएसटी लागू असताना एपीएमसी सेस त्वरित रद्द करा, अन्नसुरक्षा कायद्यातील जाचक तरतुदी हटवा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवाने ऑनलाईन उपलब्ध करा, या मुख्य मागण्या करण्यात आल्या.
दुहेरी कर आकारणी अन्यायकारक असल्याचे सांगत, सरकारने निर्णय न घेतल्यास बेमुदत बंदचा इशारा , कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिला. चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, धान्य व्यापारी वैभव सावर्डेकर यांनी तीव— भावना व्यक्त केल्या. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधीक्षक उदय उलपे,कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी यांना निवेदने देण्यात आली.
यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, भरत ओसवाल, मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय कागले, श्रीनिवास मिठारी, अमर क्षीरसागर, विवेक नष्टे, धन्यकुमार चव्हाण, धर्मेंद्र नष्टे, किरण तपकिरे, भाजीपाला मार्केट असोसिएशनचे रहीम बागवान, फळ मार्केट असोसिएशनचे नईम बागवान, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे विजय हावळ, कापड व्यापारी संघाचे संपत पाटील, हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग, शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशनचे निलेश पटेल, जयेश ओसवाल, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे रमेश कारवेकर, रणजीत पारेख, इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनचे अनिल धडाम, कोल्हापूर फुटवेअर्स असोसिएशनचे शिवाजीराव पोवार, पानपट्टी असोसिएशनचे अरुण सावंत, नारळ व्यापारी असोसिएशनचे अविनाश नासिपुडे, तौफीक मुल्लाणी, अॅड इंद्रजित चव्हाण, सचिन पाटील व विविध संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.