

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या प्राचीन व्यापाराचे संदर्भ देणारे, कोल्हापूरच्या सांस्कृतिक कारकिर्दीला झळाळी देणारे, ऐतिहासिक ऐवजांचा माहितीपूर्ण खजिना असलेले आणि चित्रशिल्पाकृतींच्या जपणुकीतून प्राचीन वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे कोल्हापुरातील टाऊन हॉल वस्तुसंग्रहालय पर्यटनाच्या द़ृष्टीने केंद्रबिंदू ठरत आहे. गेल्या एका वर्षात या वस्तुसंग्रहालयाला 20 हजार पर्यटकांनी हा खजिना अनुभवला असून उन्हाळी, हिवाळी सुट्टीच्या काळात पर्यटकांचा वाढता ओघ या वस्तुसंग्रहालयाचे महत्त्व अधोरेखित करत आहे.
कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोड येथे मध्यवर्ती निसर्गरम्य परिसरात असलेल्या टाऊन हॉल वस्तुसंग्रहालयाला भेट देऊन येथील प्राचीन वस्तू, पुतळे, निसर्गचित्रे, उत्खननात सापडलेल्या दुर्मीळ वस्तू, नाणी, शिलालेख, कोल्हापूरचे जगासोबत असलेल्या व्यापाराचे पुरावे देणारे दाखले यासंदर्भातील ऐवज पाहण्यासाठी आणि त्यामागचा इतिहास जाणून घेण्यासाठी पर्यटक तसेच अभ्यासक व संशोधक येण्याचे प्रमाण वाढत आहे. शालेय सहलींमधून येणारे विद्यार्थी तसेच हेरिटेज वॉक उपक्रमातील सहभागी पर्यटकांनाही टाऊन हॉल वस्तुसंग्रहालयातील सफर माहितीपूर्ण अनुभव देणारी ठरत आहे.
या वस्तुसंग्रहालयात अत्यंत प्राचीन व दुर्मीळ वस्तू असल्याने त्यांच्यावर बदलत्या हवामानाचा परिणाम होऊ नये, याची दक्षता घेतली जाते. यासाठी चंदन, हस्तीदंत यापासून तयार झालेल्या दुर्मीळ वस्तू, अलंकार यांच्यावर हवामानामुळे बुरशी येऊ नये, यासाठी हवामान नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच या वस्तूंवर जे प्रकाशझोत लावण्यात आले आहेत, त्यांचे लक्स प्रमाण नियंत्रित ठेवले जाते जेणेकरून अतिरिक्त लाईटमुळे या दुर्मीळ वस्तूंना धोका पोहोचणार नाही.
संग्रहालयात एकूण सात दालने असून, 1947 पासूनच्या ऐतिहासिक घडामोडींचा दस्ताऐवज इथे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. प्रत्येक दालनात प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंशी संबंधित माहिती तसेच त्या वस्तूंचा ऐतिहासिक संदर्भ पर्यटकांना उपलब्ध करून दिला जातो. प्राचीन वारसा आणि सांस्कृतिक जतन याचे उत्तम उदाहरण ठरणार्या या संग्रहालयाने पर्यटनाच्या नकाशावर स्वतःचे ठळक स्थान निर्माण केले आहे.
रविवारी दि. 18 मे रोजी जागतिक वस्तुसंग्रहालय दिन साजरा झाला. यानिमित्ताने टाऊन हॉल म्युझियममध्ये येणार्या सर्वांना मोफत प्रवेश देण्यात आला. दिवसभरात या वस्तुसंग्रहालयाला 338 पर्यटकांनी भेट देऊन येथील दुर्मीळ वस्तू पाहून माहिती जाणून घेतली, अशी माहिती सहायक अभिरक्षक उदय सुर्वे यांनी दिली.