

सागर यादव
कोल्हापूर : कोल्हापूरचे ऐतिहासिक वैभव आणि जभरातील पर्यटकांचे आकर्षण असणार्या टाऊन हॉल उद्यानाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव गतवर्षी झाला. तब्बल 150 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे दुर्मीळ उद्यान अद्यापही दुर्लक्षित असल्याचे वास्तव आहे. उद्यानाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या उद्यान विभागाकडून केलेल्या आरखड्याला अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.
विविधतेने नटलेले उद्यान
तब्बल 8 एकर इतक्या प्रशस्त जागेत एकवटलेली 90 हून अधिक देशी-विदेशी दुर्मीळ वनसंपदा, 33 प्रकारची फुलपाखरे, 6 प्रकारचे सस्तन प्राणी, 5 प्रकारच्या पाली व सरडे, आशिया खंडातील सर्वात मोठी वटवाघळांची वसाहत अशी अनेक वैशिष्ट्ये कोल्हापूरच्या टाऊन हॉल उद्यानात एकवटली आहेत. ‘नोटस् ऑन कोल्हापूर’ व ‘कोल्हापूर राज्याचा इतिहास’ अशा दुर्मीळ पुस्तकांमध्ये या उद्यानाचे संदर्भ मिळतात.
चिटणीसाचे झाड, पायमोजा वृक्ष आणि बरचं काही
टाऊन हॉल उद्यानात चिटणीसाचे, पायमोजाचे झाड, अॅटोग्राफ, आरारा नट, भल्या मोठ्या बुंध्याचा पर्जन्य वृक्ष, अनोख्या पानांची सुवर्णपर्णी, देखण्या फुलाचे कैलासपती व ब—ाऊनिया, यांग-यांग, अर्वाचीन जगाचा निर्देशांक सायकस, जगातील सर्वात लांब पाकळीचे पचिरा झाड अशी वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहेत. याशिवाय पारंपरिक सीताअशोक, बेहडा, कापूर, जारुल, मुचकंद, नेवर, सुकाणू, उंडी, सुरंगी, बहावा, कदंब, करमळ आदी अस्सल देशी वृक्षही आहेत.
अद्याप उपाय-योजना नाही
गतवर्षी हेरिटेज दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांनी दिली होती. अद्याप याबाबत कोणतीही उपाय-योजना झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने टाऊन हॉल उद्यानाच्या विकासासाठी आर्किटेक्ट रणजित निकम यांनी आराखडा तयार केला असून तो मंजुरीसाठी शासनाकडे वर्ग केला असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जयेंद्र पानसरे यांनी दिली.