

सागर यादव
कोल्हापूर : कोल्हापूरला लाभलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील भौगौलिक-पर्यावरणीय वैशिष्ट्यांमुळे विविध राजवटीत राज्याच्या संरक्षणासाठी गडकोट-किल्ल्यांची बांधणी करण्यात आली. शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासामुळे या गडकोटांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. जिल्ह्यातील 13 गडकोट-किल्ले पर्यटकांचे आकर्षण आहेत.
पन्हाळगड : कोल्हापूरपासून 20 कि.मी. अंतरावर समुद्रीसपाटीपासून 953 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. शिलाहार, यादव, बहामणी, आदिलशाही, मराठा, मोगल अशा अनेक राजवटींच्या इतिहासाचा हा साक्षीदार आहे.
पावनगड : यागडाची निर्मिती शिवछत्रपतींनी इ.स. 1674 मध्ये केली. समुद्री सपाटीपासून 953 मीटर उंचीवर हिरोजी फर्जंद व आर्जोजी यादव यांनी हा किल्ला बांधला. गुहा, तुपाची विहीर, मंदिर, तलाव, बुरूज या गडावर आहेत.
विशाळगड : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर 80 कि.मी. अंतरावर समुद्रसपाटीपासून 1021 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. परिसरात पावनखिंड, आंबा घाटाचे जंगल, देवराई, धरण अशी विविधता एकवटली आहे.
भुदरगड : कोल्हापूरपासून दक्षिणेला 50 कि.मी. अंतरावर गारगोटी परिसरात समुद्रसपाटीपासून 978 मीटर उंच आहे. तटबंदी, भैरवनाथ मंदिर, दीपमाळ, ध्वजबुरूज, कचेरी, तलाव, मंदिरे, गुहा गडावर आहेत.
रांगणा : कोल्हापूरच्या दक्षिणेला 100 कि.मी. अंतरावर समुद्रसपाटीपासून 679 मीटर उंचीवर आहे. तटबंदी, दरवाजे, चोरवाटा, वाड्याचे आवशेष, मंदिरे, तलावासह मौनी महाराज मठ, धरण, जंगल अशी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.
गगनगड : कोल्हापूरच्या पश्चिमेला 55 कि.मी. अंतरावर गगनबावडा घाटात समुद्रसपाटीपासून 691 मीटर उंचीवर आहे. गडावर राजवाड्याचे अवशेष, बालेकिल्ला, लेणी मंदिर, गगनगिरी महाराज मठ आदी वास्तू आहेत.
शिवगड : कोल्हापूरपासून 80 कि.मी. अंतरावर दाजीपूर अभयारण्यातील राधानगरी व काळम्मावाडी धरण परिसरात समद्रसपाटीपासून 728 मीटर उंच आहे. यात बुरुज, तटबंदी, भग्न प्रवेशद्वार अशा मोजक्याच वास्तू शिल्लक आहेत.
मुडागड : कोल्हापूरच्या पश्चिमेला 45 कि.मी. अंतरावर पडसाळी गावाच्या दक्षिणेला काजीर्डा घाटात समुद्रसपाटीपासून 698 मीटर उंच. या परिसरात राजर्षी शाहू महाराजांनी शिवारण्य हे राखीव जंगल केले होते.
सामानगड : गडहिंग्लज तालुक्यात समुद्रसपाटीपासून 916 मीटर उंचीवर हा गड आहे. येथे देवतांच्या मूर्ती, कातळ दगडांचे भुयार, विहिर संकुल, लेणींसह सरसेनापती प्रतापराव गुजर व त्यांच्या सहा शिलेदारांचे स्मारक आहे.
महिपाळगड : चंदगड तालूक्यात समुद्रसपाटीपासून 982 मीटर उंचीवरील किल्ल्यात प्राचीन गुहा, मंदिरे, बालेकिल्ला, गणेश दरवाजा, विहिरी आहेत. बेळगावातील मराठा बटालियनचे जवान किल्ल्यावर सराव करतात.
गंधर्वगड : चंदगड तालुक्यात समुद्रसपाटीपासून 916 मीटर उंचीवर! तटबंदी, तीन चोर दरवाजे, विविध दैवतांची मंदिरे, नागमूर्ती, वाड्याचा चौथरा अशा वास्तू येथे आहेत. देश स्वातंत्र्य लढ्याचाही हा साक्षीदार आहे.
पारगड : कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला समुद्रसपाटीपासून 738 मीटर उंचीवर जंगल परिसरात हा किल्ला आहे. तटबंदी, तलाव, 18 विहिरी, समाध्या, तोफा, मंदिरे अशा वास्तू यावर पहायला मिळतात.
कलानिधीगड : चंदगड तालुक्यात समुद्रसपाटीपासून 1015 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. प्रवेशद्वार, विविध देवतांची मंदिरे, समाधी, तटबंदीसह सभोवतालच्या जंगलामुळे हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे.