

कसबा बावडा : महायुतीमध्ये एकत्र काम करत असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हेच गोकुळ दूध संघात संचालक पदाचे ‘टोकन’ देत फिरत असतील, तर ते चुकीचे आहे. संघाचा कारभार खरंच चांगला चालला असेल, तर मग ही टोकण वाटण्याची वेळच का आली, असा थेट सवाल करत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांना लक्ष्य केले आहे. ‘गोकुळ’मधील संचालक संख्या वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाडिक म्हणाले, आमची तब्बल 32 वर्षे ‘गोकुळ’वर सत्ता होती; पण आम्ही कधीही संचालक संख्या 18 च्या पुढे नेली नाही. संचालक वाढवून संघाचा विकास होत नसतो. उलट संघावरील खर्चाचा बोजा वाढतो. हा पायंडा संघासाठी अत्यंत धोकादायक आहे. खिरापत वाटावी तशी संचालक पदे वाटण्याच्या या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे आणि संचालिका शौमिका महाडिक यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. सत्ताधार्यांनी संचालक वाढवण्याऐवजी दूध उत्पादकांना जादा दर कसा मिळेल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते.
‘गोकुळ’च्या आर्थिक कारभारावरही महाडिक यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, मागील वर्षी संघाच्या ठेवी 142 कोटी होत्या. त्या आता अचानक 542 कोटी कशा झाल्या? अवघ्या एका वर्षात वाढलेल्या या 400 कोटी रुपयांच्या ठेवी कुठून आल्या, याचा हिशेब सत्ताधार्यांनी दिला पाहिजे. दहा वर्षांपूर्वी प्राप्तिकर विभागाने संघाची खाती गोठवून वसूल केलेल्या 32 कोटी रुपयांचा परतावा दोन टप्प्यांत परत मिळाला. ती रक्कम कुठे गेली, याचाही खुलासा व्हायला हवा.
महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असताना नवी मुंबईतील भोकरपाडा येथील जमीन खरेदीसाठी गोकुळने 30 ते 32 कोटी रुपये दिले. ही जागा अलीकडे विकासकाला दिली आहे. संघाने गुंतवलेले पैसे परत मिळणार का नाही, असा सवाल महाडिक यांनी उपस्थित केला.
दूध संकलन करणार्या संस्थांना जाजम व घड्याळ देण्यासाठी निविदा न काढता साडेचार कोटींची खरेदी करण्यात आली. गोकुळच्या कार्यकारी संचालकांना तीन लाखांपेक्षा जास्त खरेदीचे अधिकार नसताना ही खरेदी का केली? त्याचे पैसेही एका दिवसांत दिले. हा व्यवहार संशयास्पद असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे. कोरोना काळात गोकुळने कोट्यवधी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्रकल्प उभा केला. सध्या तो बंद आहे. त्यामुळे ही गुंतवणूकही वाया गेली. याला जबाबदार कोण, असा प्रश्न महाडिक यांनी उपस्थित केला.