

जयसिंगपूर : येथील शहरातील वरेकर कॉलनी येथील मोबाईल टॉवरसाठी काढलेल्या खड्ड्यात पडून रिदम महेंद्र राव या अडीच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेने जयसिंगपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे.
वरेकर कॉलनीत चांदणे कुटुंबीयांच्या जागेवर मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या टॉवरसाठी खोल खड्डा काढण्यात आला होता. या खड्ड्यात पाणी साचले होते. बुधवारी दुपारी अडीच वर्षांचा रिदम हा खेळत असताना खड्ड्यात पडला. यात त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, रिदम याच्या आईचे येत्या शनिवारी ऑपरेशन असल्यामुळे त्या सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कागदपत्र दाखवण्याकरिता गेल्या होत्या. त्या घरी दाखल झाल्यानंतर आईचा व त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.