Ambabai Temple | ‘तिरुपती’कडून अंबाबाईला मानाचा शालू

पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक; ‘गोविंदा रे गोविंदा’, ‘अंबाबाईचा उदो उदो’चा जयघोष
कोल्हापूर :  अंबाबाईच्या दर्शनासाठी झालेली गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात तिरुपती बालाजी देवस्थानकडून अंबाबाईला अर्पण करण्यात आलेल्या मानाच्या शालूची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी झालेली गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात तिरुपती बालाजी देवस्थानकडून अंबाबाईला अर्पण करण्यात आलेल्या मानाच्या शालूची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : तिरुपती देवस्थानकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाईला एक लाख ४५ हजार रुपये किमतीचा मानाचा रेशमी शालू शुक्रवारी (दि. १६) अर्पण करण्यात आला. तिरुपती देवस्थानचे सुपरिटेंडंट डी. मोहन राव यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी हा शालू स्वीकारला.

शारदीय नवरात्रौत्सवात दरवर्षी तिरुपती देवस्थानकडून श्री अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. घटस्थापनेनंतर अष्टमीपूर्वी हा शालू देवीला अर्पण केला जातो. यंदाही परंपरेनुसार शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास भवानी मंडप येथून तिरुपती देवस्थानचे सदस्य मानाचा शालू घेऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री अंबाबाई मंदिरात दाखल झाले. यावेळी ‘गोविंदा रे गोविंदा’ आणि ‘अंबाबाईचा उदो उदो’ अशा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

मानाच्या शालूसोबत बांगड्या, ओटीचे साहित्य, तिरुपतीचा प्रसाद, हळदी-कुंकू, फुले आणि गजरा असे शुभ साहित्यही आणण्यात आले होते. या साहित्यामुळे धार्मिक सोहळ्याला पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले. शालू घेऊन आलेल्या तिरुपती देवस्थानच्या सदस्यांनी श्री अंबाबाई मंदिराला प्रदक्षिणा घातली. नंतर मानाचा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे अर्पण करण्यात आला. याप्रसंगी तिरुपती देवस्थानचे टी. रामाराव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे व्यवस्थापक महादेव दिंडे, रवी खासनीस आदी उपस्थित होते.

दोन्ही देवस्थानांमधील भक्तिभावाचे नाते

तिरुपती देवस्थानकडून श्री अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्याची परंपरा नवरात्रौत्सवातील महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो. दरवर्षी श्रद्धापूर्वक जपल्या जाणाऱ्या या परंपरेतून दोन्ही देवस्थानांमधील भक्तिभावाचे नाते अधोरेखित होते. यंदाही पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि देवीच्या जयघोषात हा सोहळा पार पडला.

मानाच्या शालूची वैशिष्ट्ये

प्रकार : दक्षिणात्य पद्धतीतील रेशमी साडी, रंग फिकट गुलाबी

किंमत : १ लाख ४५ हजार रुपये

वैशिष्ट्य : तिरुपती देवस्थानकडून श्री अंबाबाईला नवरात्रौत्सवात अर्पण केला जाणारा मानाचा शालू

परंपरा : घटस्थापनेनंतर आणि अष्टमीपूर्वी शालू अर्पण केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news