

कोल्हापूर : नवरात्रौत्सवात तिरुमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठवण्याची प्रथा आहे. सोमवारी अंबाबाईसाठी आलेल्या रेशमी शालूचे वाजत-गाजत आगमन झाले. मोरपंखी रंगाला गुलाबी काठ असलेल्या या शालूची किंमत एक लाख 66 हजार 100 रुपये आहे.
पारंपरिक रीतीरिवाजाप्रमाणे या शालूचे पूजन करून तो अंबाबाईला अर्पण केला. यावेळी तिरुमला देवस्थानचे चेअरमन बी. आर नायडू गुरू यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत देवस्थानकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रभाकर रेड्डी, प्रशांती, भानू प्रकाश रेड्डी, सौरभ वोरा, नरेश कुमार, खा. श्रीकांत शिंदे यांच्यासह देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्रज्ञ गणेश नेर्लेकर आदी उपस्थित होते.
सकाळी दहा वाजता तिरुपती देवस्थानचे पदाधिकारी कोल्हापुरात शालू घेऊन दाखल झाले. एका तबकात शालू, ओटी, गजरा, फळे, लाडू, हार, पानाचा विडा ठेवण्यात आला होता. दक्षिण प्रवेशद्वारातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात शालूसह सर्व पदाधिकारी मंदिरात आले. यावेळी अंबाबाई आणि तिरुपती बालाजी यांचा जयघोष करण्यात आला. सर्व मानकर्यांचे देवस्थान समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.