कोल्हापूर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी कोल्हापुरात शनिवारी भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले होते. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. भारतीय सैन्याच्या पराक्रमाला या तिरंगा रॅलीतून सलाम करण्यात आला.
‘लाल सिंदूर की ललकार, पाकिस्तान में हाहाकार’ असे फलक घेऊन नागरिक रॅलीत सहभागी झाले होते. ‘आम्ही कोल्हापुरी भारतीय सैनिकांबरोबर’ अशा घोषणांनी दसरा चौक दणाणला. भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय सैनिकांची वेशभूषा परिधान करून चिमुकले रॅलीत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकाच्या हाती तिरंगा ध्वज होता.
पदयात्रा आईसाहेब महाराज महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी रोडमार्गे येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसजित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी देशभरात भाजपतर्फे तिरंगा पदयात्रा रॅलीचे आयोजन केले आहे. निवृत्त कर्नल विलास सुळकुडे म्हणाले, भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 29 दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले. ही पाकिस्तानच्या हद्दीमधील आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, महेश जाधव, विजय जाधव, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, जयेश ओसवाल, राहुल चिकोडे, संग्राम निकम, संगीता खाडे, गायत्री राऊत, धनश्री तोडकर यांच्यासह आजी-माजी सैनिक, महिला, विविध संस्था पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.