

कोल्हापूर : विरोधकांचा जिल्ह्यात एकही आमदार नाही, राज्यात आणि केंद्रात सत्ता नाही, मंत्री नाही मग निधी आणणार कुठून ? जनतेची फसवणूक करू नका. भूलथापा मारू नका. अजूनही वेळ गेलेली नाही. महायुतीला पाठिंबा द्या, असा सल्ला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांना दिला. महायुतीच्या कर्तव्यनामा प्रकाशनप्रसंगी मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुश्रीफ म्हणाले, मंत्री थेट पाईपलाईन योजनेवेळी आम्ही सत्तेत होतो; मात्र आजच्याप्रमाणे त्यावेळी छोटी भूमिका होती. नैसर्गिक आणि हवामान याचा अभ्यास न करता काळम्मावाडी थेट पाइनलाईन योजना राबविली. त्यामुळे काही त्रुटी राहिल्या आहेत. शहरासाठी जे आवश्यक व गरजेचे आहे, ते सर्व सुविधा महायुती देणार आहे. सर्किट बेंच, अंबाबाई यामुळे शहरात पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरावरील ताण वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येसाठी राहण्याची सोय पार्किंग, हॉटेल अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी रस्ते, पार्किंग, पाणी, वीज, शौचालय अशा सुविधा देण्याची गरज आहे.
मिरज, पुण्यानंतर वैद्यकीय सुविधांबाबत कोल्हापूरचा नावलौकीक आहे. कोल्हापूरचे नाव देशाच्या नकाशावर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहरांतर्गत भुयारी रस्ते आणि मेट्रो सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे. शहराचे प्रश्न सोडविण्याची ताकद फक्त महायुतीमध्येच आहे, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले. कोल्हापूरची हद्दवाढ करावी लागेल. त्यासाठी ग्रामीण जनतेला शहरात मुबलक आणि पुरेशा सुविधा मिळतात, असा विश्वास निर्माण करावा लागेल. हा विश्वास निर्माण करण्याचे काम महायुती करेल. त्यासाठी महापालिकेत सत्ता द्यावी. अमृत योजनेचे काम एक वर्षात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही महायुतीच्या नेत्यांनी दिली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, शहारातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याची वचनपूर्ती करण्याची हिम्मत महायुतीमध्येच आहे. शहरवासीयांना पारदर्शी प्रशासन आणि ऑनलाईन परवाने देण्यावर भर राहील. महापालिकेची मुख्य इमारत नव्याने उभारण्यात येणार आहे. कोल्हापूर हे मेडिकल हब होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेतील 81 पैकी 65 नगरसेवक महायुतीचे विजयी होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापुरात कार्यक्रम झाल्यानंतर यामध्ये वाढ होऊन ही संख्या 70 ते 72 पर्यंत जाईल. मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत होणार असून शहरातील 40 ठिकाणी हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. यामध्ये व्हिजन कोल्हापुरबाबत मुख्यमंत्री बोलणार आहेत. राज ठाकरे यांनी केलेला आरोपाचे पुरावे काय? 20 हजार कोटी काय, दोन लाख कोटी रुपये म्हणू शकतात; मात्र त्याला पुरावे लागतात. ज्या त्या यंत्रणेकडे तक्रार करावी, असा सल्ला दिला.
राज्य नियोजन मंडळचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापूर नियंत्रण कार्यक्रम, शहराचा विकास आराखडा आणि आयटी पार्कबाबत सविस्तर माहिती देऊन ही सर्व कामे महायुती सरकारने मार्गी लावली आहेत. काही कामे प्रगतीत असून अनेक कामांना सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासकीय सुधारणांना प्राधान्य, मनपासाठी नवी इमारत, जनतेतून अर्थसंकल्प, घरफाळा आकारणीत सुटसुटीतपणा उद्योगासह आयटी हबला प्राधान्य, लोकसहभागातून उद्यानांचे सुशोभीकरण, कलाभूमीचा सन्मान आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची व्याप्ती आदी महत्त्वाच्या मद्द्यावर कर्तव्यनाम्यात भर दिला आहे.