

कोल्हापूर : टिंबर मार्केट, गंजीमाळ, राजाराम चौक परिसरात दहशत माजवून चारचाकी मोटार, रिक्षा, टेम्पोसह दुचाकी, टपऱ्या, हातगाड्यांची तोडफोड करणाऱ्या जवाहरनगर, राजेंद्रनगर परिसरातील टोळीचा म्होरक्या रूद्र ऊर्फ रुद्राक्ष संदीप लोकरे (१९, रा. सुभाषनगर, कोल्हापूर), साथीदार आरबाज इम्तियाज बिजली (२०, लाड चौक, शिवाजी पेठ), गणेश ऊर्फ सिद्धाप्पा नासिक सुरते (२०, मोरेवाडी, ता. करवीर) यांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. हल्लेखोराना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, टिंबर मार्केट, गंजीमाळसह परिसरात सोमवारी मध्यरात्री धुमाकूळ घालून जवाहरनगर, राजेंद्रनगर, सुभाषनगर परिसरातील तरुणांनी दहशत माजवून २५ वाहनांची तोडफोड करून मोठे नुकसान केले होते. हल्लेखोरांनी तलवारी, एडका, लोखंडी रॉडसह धारदार शस्त्रांचा वापर करून निष्पाप नागरिकांवरही दहशत माजविली होती. याप्रकरणी म्होरक्या रुद्र लोकरे, अरबाज बिजली, सुरतेसह टोळीवर गुन्हा दाखल झाला आहे. जुना राजवाडा पोलिसांनी हल्लाप्रकरणी दोन अल्पवयीन संशयितासह सहाजणांना अटक केली होती. गुरुवारी सकाळी रुद्र लोकरे, आरबाज बिजली, सुरतेला अटक केली. दुपारी त्याना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
हल्लेखोरावर कठोर कारवाई करणार : नीलोत्पल
टिंबर मार्केट परिसरातील हुल्लडबाजीच्या घटनेची पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गंभीर दखल घेतली आहे. तपासाधिकारी किरण लोंढे यांच्याकडून त्यांनी सकाळी आढावा घेतला. म्होरक्यासह टोळीतील संशयितांवर कठोर कारवाईचे त्यांनी आदेश दिले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव तत्काळ दाखल करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत.