

आजरा : आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात सर्फनाला प्रकल्प आहे. या प्रकल्प परिसरात दुपारी साडेबारा वाजता बांधकाम ठेकेदाराला वाघाचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्येे वन विभागाला वाघाबाबतचे पुरावे मिळाले होते. दरम्यान, सर्फनाला प्रकल्पावर सध्या काम सुरू आहे. काम सुरू असताना इंजिनिअर अभिषेक नलावडे यांना वाघाचे दर्शन झाले. त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचा व्हिडीओ बनविला. सर्फनाला परिसरात वाघाचा अधिवास स्पष्ट होतो. वन विभागाच्या एका वनपालने वाघाच्या दर्शनाबाबत दुजोरा दिला आहे.
दरम्यान, मजूर कामासाठी चालले होते. यावेळी झुडपात त्यांना हालचाल दिसली. त्यांनी दूरवरून पाहिल्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यांनी हालचाल न करता गाडीतून वाघाची हालचाल टिपली. सदरचा वाघ हा पाण्याच्या दिशेने गेल्याचे त्यांना आढळले. काही वेळानी त्यांनी पुन्हा येऊन त्या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांना वाघाच्या पायाचे ठसे मिळून आले.