

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने भारावलेल्या मराठ्यांच्या इतिहासातील थरारक अनुभव ‘गोष्ट इथे संपत नाही’ या नव्या सादरीकरणातून समोर येणार आहे. दैनिक ‘पुढारी’च्या वतीने आयोजित या इतिहासप्रधान कार्यक्रमातून प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेली ‘शिवप्रताप’ ही रोमांचकारी शौर्यगाथा कोल्हापूर आणि सांगलीतील इतिहासप्रेमींना अनुभवता येणार आहे. इतिहासाची आवड असणार्यांसाठी हा कार्यक्रम अनुभवण्याची मोठी पर्वणी ठरणार आहे.
सारंग मांडके आणि सारंग भोईरकर हे दोन आयटीतील तरुण हा इतिहास जिवंत करणार असून, त्यांना सादरीकरणातील मोठा अनुभव आणि अभ्यास आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या या उच्चशिक्षित इतिहासप्रेमींनी मिळून मराठा इतिहासावर ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाचे गेल्या पाच वर्षांत 100 हून अधिक प्रयोग यशस्वी केले आहेत.
प्रत्येक प्रयोगात ते शिवचरित्रातील एखाद्या ऐतिहासिक घटनेची निवड करून, त्यात नकाशे, कालावधी, प्रमुख व्यक्ती, रणनीती, ऐतिहासिक स्थळे या सार्यांचा वापर करून एक प्रभावी, द़ृकश्राव्य माध्यमातून अनुभव देतात. यावेळी ते ‘शिवप्रताप’ या विशेष प्रसंगावर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत. बुकिंगसाठी मोबाईल क्रमांक : 9561626663.