Illegal Abortion Case | गर्भलिंग निदान, गर्भपातप्रकरणी दोन डॉक्टरसह तिघांना कारावास

आपटेनगरातील महिला डॉक्टरचा समावेश; ११ वर्षांनंतर खटल्याचा निकाल
Illegal Abortion Case |
Illegal Abortion Case | गर्भलिंग निदान, गर्भपातप्रकरणी दोन डॉक्टरसह तिघांना कारावास
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपातप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने हरपवडे (ता. पन्हाळा) व कोल्हापूर (आपटेनगर) येथील दोन डॉक्टरसह तिघांना सोमवारी (दि. २) दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०१५ मध्ये पन्हाळा तालुक्यात ही घटना घडली होती. ११ वर्षांनंतरही खटल्याच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

शिक्षा झालेल्यांत डॉ. तानाजी शिवाजी पाटील (वय ४२, रा. हरपवडे, ता. पन्हाळा), डॉ. सारिका मधुकर सावंत (३५, आपटेनगर, कोल्हापूर), प्रकाश शिवाजी कुंभार (४०, मोहरे, ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे. गजेंद्र ऊर्फ सनी बापूसाहेब कुसाळे (३९, शिरशी, ता. राधानगरी), कैलास गोपाळदास नोतान (४५, गांधीनगर, ता. करवीर), सत्येन सुरेश माळकर (५२, कागल) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या बहुचर्चित खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यासमोर झाली. तत्कालीन सरकारी वकील ॲड. अमित महाडेश्वर, सहायक सरकारी वकील ॲड. अमृता पाटोळे यांचा युक्‍तिवाद, वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे, प्रत्यक्ष पुरावा ग्राह्य धरून न्‍यायालयाने दोन डॉक्टरसह तिघांना दोषी ठरविले.

खटल्याची पार्श्वभूमी : मोहरे (ता. पन्हाळा) येथील पीडितेला नोव्हेंबर २०१५ पूर्वी पहिली मुलगी झाली. पुढे मुलगी नको, म्हणून सत्येन माळकर याने पुरविलेल्या सोनोग्राफी मशिनवर गजेंद्र कुसाळे याने महिलेची गर्भलिंग निदान चाचणी केली. त्यात मुलगी असल्याचे निदान झाल्यानंतर कैलास नोतान याने गर्भपातासाठी पीडितेला डॉक्टरकडे पाठवले. गर्भपातानंतर प्रकृती गंभीर बनल्याने तिला राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्‍या जबाबानंतर संबंधित महिलेचा पती, डॉक्टरसह सहाजणांविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नाईक यांनी संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.