

कोल्हापूर : शून्य प्रलंबितता व दैनंदिन प्रकरणे निकाली काढण्यासाठी राबवलेल्या मोहिमेंतर्गत कार्यालयीन कामकाजात अनियमितता दिसून आल्याचा ठपका ठेवत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कोल्हापूर विभागाचे तत्कालीन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे, प्रशासन अधिकारी धैर्यशील कारीदकर आणि वरिष्ठ लिपिक बाबासाहेब बीडकर यांना गुरुवारी निलंबित केले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी हे. प. बाविस्कर यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील अॅक्शन मोडवर असून त्यांनी कोल्हापूरसह राज्याच्या उच्च शिक्षण विभागातील पहिलीच मोठी धडक कारवाई केल्याने शिक्षण विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
तत्कालीन सहसंचालक डॉ. नाकाडे यांच्या कार्यकाळात कोल्हापूर विभागांतर्गत येणार्या महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचार्यांची भरती करण्यात आली. ही भरती प्रक्रिया अनियमित असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. काही महिन्यांपूर्वी उच्च शिक्षण विभागाने शून्य प्रलंबितता व दैनंदिन प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्यभरातील सहसंचालक कार्यालयात विशेष मोहीम राबविली. मोहिमेंतर्गत कोल्हापूर विभागीय सहसंचालक, कार्यालयाच्या तपासणीदरम्यान अनियमितता आढळून आली.
यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संदीप पाटील व केशव तुपे यांची द्विसदस्यीय समिती नेमली. नियुक्त समितीने त्यांचा अहवाल 7 मे रोजी शासनास सादर केला. अहवालामध्ये तत्कालीन सहसंचालक व सध्या छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय महाविद्यालयात कार्यरत डॉ. नाकाडे, सध्या सोलापूर विभागीय सह. संचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी धैर्यशील कारीदकर आणि कोल्हापुरातील ताराबाई अध्यापक विद्यालयात सध्या कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक बाबासाहेब बीडकर या तिघांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार तिघांचे निलंबन केले आहे.
शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचार्यांच्या भरतीला राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र, हा नियम डावलत डॉ. नाकाडे यांच्या कार्यकाळात सुमारे शंभर शिक्षकेतर कर्मचार्यांची भरती झाल्याचा आरोप झाला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर कार्यालयास अचानक भेट दिली. त्यावेळी काही ऑर्डर त्यांना आढळून आल्याची माहिती समजते.