

सागर यादव
कोल्हापूर : मालवणमधील सिंधुदुर्गातील शिवछत्रपतींच्या मंदिराला राज्य शासनाने वार्षिक एक लाखाचे अनुदान मंजूर केले आहे. सुमारे 56 वर्षांनंतर देखभाल, दिवाबत्तीच्या खर्चात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग व त्यातील शिवछत्रपतींचे मंदिर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरकर छत्रपतींचे तीन शतकांचे ऋणानुबंध असून, आजही हा वारसा जपण्यात आला आहे.
शिवछत्रपतींच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी इ. सन. 1695 ते 1700 या कालावधीत पहिले मंदिर बांधले. मंदिरात शिवछत्रपतींची काळ्या पाषाणातील विरासनातील मूर्ती बसविली. छत्रपती राजाराम महाराज यांचे द्वितीय पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी जिजाबाई यांनी 21 नोव्हेंबर 1763 रोजी सिंधुदुर्गचा सुभेदार येसाजी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामधून महत्त्वाची माहिती मिळते. जिजाबाईंनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर असणार्या शिवछत्रपतींच्या उजव्या हाताच्या व डाव्या पायाच्या ठशांच्या संरक्षणासाठी छोट्या घुमट्या (गची व कोनाडा) बांधून घेतल्या. तसेच येथे नैवेद्य व दिवा लावण्याची तरतूद केली. इ. सन. 1764 ला सिंधुदुर्ग इंग्रजांनी ताब्यात घेऊन त्याचे नाव फोर्ट ऑगस्टस केले होते. जिजाबाईंनी तो अथक प्रयत्नांनी परत मिळविला.
कोल्हापूरकर छत्रपतींच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरातील शिवछत्रपतींच्या मूर्तीला जिरेटोप व वस्त्र देण्याची परंपरा आहे. सिंधुदुर्गच्या इतिहास जतन-संवर्धनाचे कार्य संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत लिखित सिंधुदुर्ग या पुस्तकाचे प्रकाशन सिंधुदुर्ग किल्ल्यातच झाले. शिवराजेश्वर मंदिरातील शिवछत्रपतींच्या वापरातील तलवार समुद्राच्या खार्या वार्यामुळे खराब होऊ लागली होती. तिचे संरक्षण व्हावे यासाठी संभाजीराजे यांनी काचेची पेटी व नित्य पूजेसाठी तलवारीची प्रतिकृती भेट दिली. शिवछत्रपतींच्या मूर्तीस कोल्हापूरकर छत्रपतींच्या वतीने जिरेटोप व पोशाख आजही दिला जातो.
शिवभक्त राजर्षी शाहू महाराज यांनी सिंधुदुर्गावरील शिवराजेश्वर मंदिरासमोर भव्य सभामंडप बांधला (इसवी सन 1906-07). त्यासाठी 3,850 रुपयांचा खर्च केला होता. या मंदिराप्रमाणेच त्यांनी पन्हाळगड व कोल्हापूर येथे शिवरायांची मंदिरे बांधली. सिंधुदुर्गावरील शिवछत्रपतींच्या हाताच्या ठशावरून राजर्षी शाहूंनी चांदीच्या हाताचा ठसा तयार करून घेतला होता. आजही कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरात हा हाताचा ठसा पाहायला मिळतो.